अलिशान वाहने भाड्याने घेऊन ती परस्पर गहाण ठेवणारा.. नटवरलाल गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

अलिशान वाहने भाड्याने घेऊन ती परस्पर गहाण ठेवणारा.. नटवरलाल गजाआड.

 अलिशान वाहने भाड्याने घेऊन ती परस्पर गहाण ठेवणारा.. नटवरलाल गजाआड.

2 कोटी 69 लाख रुपयांच्या16 आलिशान कार जप्त.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः इनोव्हा क्रिस्टा, टाटा , स्विफ्ट स्कार्पिओ, बीएमडब्ल्यू, स्विफ्ट डिझायर अशी आलिशान वाहने भाड्याने घेऊन ती परस्पर गहान ठेवून कोट्यवधी रुपये कमविणार्‍या एका नटवरलालला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. 2 कोटी 69 लाख रुपये किमतीच्या 16 आलिशान कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते रा. भोयरे गांगड, ता.पारनेर असे या नटवरलालचे नाव आहे.
   टुर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीकडून वाहने भाड्याने चालविण्यासाठी घ्यायची, ही वाहने परस्पर गहाण ठेवायची, अन त्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करायची, अशा पद्धतीची फसवणूक करणारा नटवरलाल याच्या कारवाया पाहून पोलिसही चक्रावले आहेत. महेश प्रताप खोबरे (वय- 40 वर्षे, रा. बी-504, गगन रेनाई सन्स जवळ, धर्मावत पेट्रोल पंप, पिसोळ, जि- पुणे) यांचा टुर्स अन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. शशिकांत मारुती सातपुते याने खोबरे यांच्याकडून मार्च ते डिसेंबर 2020 या कालावधीत इनोव्हा क्रिस्टा, इटींगा, झेस्ट अशा एकूण 22 कार ’महाबली एन्टरप्रायजेस’ नावाने भाड्याने चालवायला घेतल्या. 22 पैकी 9 कार त्याने महेश खोबरे यांना परत केल्या. पण उर्वरित 13 कारचे भाडे व त्या कार परत काही केल्या नाहीत. तसेच याबाबत काहीच माहिती तो देत नव्हता. म्हणून खोबरे यांनी सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शशिकांत सातपुते याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभिर्य पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे हस्तांतरीत केला. तसेच आरोपीला अटक करण्याच्या व वाहने जप्त करण्याच्या व्यवस्थित सुचना दिल्या.
   पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, फौजदार गणेश इंगळे, सहायक फौजदार नानेकर, पोलिस नाईक सुरेश माळी, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल रविन्द्र घुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, चालक उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांनी तपास सुरु केला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी दादा उर्फ शशिकांत मारुती सातपूते (वय- 26 वर्षे, रा. भोयरे गांगड, ता. पारनेर) याचा शोध घेतला. त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याची पारनेर न्यायालयाकडून वेळोवेळी पोलिस कस्टडी देखील घेण्यात आली. यावेळीच त्याच्याकडून आलिशान कार जप्त केल्या.
   जप्त केलेल्या गाड्यांमध्ये 6 इनोव्हा क्रिस्टा, एक टाटा झेस्ट, एक स्विफ्ट, तसेच इतर ट्रॅव्हल्स कंपनीकडून घेतलेल्या एस क्रॉस, स्कार्पिओ जिप, आणखी 3 इनोव्हा क्रिस्टा कार, 4 बीएमडब्ल्यू कार, एक स्विफ्ट डिझायर, असा एकूण 2 कोटी 69 लाख रुपये किंमतीच्या एकूण 16 अलीशान कारचा समावेश आहे. सातपुते याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांना एक कार जप्त केली आहे. आता अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment