नगर-मनमाड मार्गावर गुंजाळे नाक्याजवळ सापडला तरुणीचा मृतदेह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

नगर-मनमाड मार्गावर गुंजाळे नाक्याजवळ सापडला तरुणीचा मृतदेह

 नगर-मनमाड मार्गावर गुंजाळे नाक्याजवळ सापडला तरुणीचा मृतदेह


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ नगर - मनमाड महामार्गाच्या बाजूला एका 18 -20 वर्षे वयाच्या अज्ञात तरुणीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे . डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड व एक दारूची फुटलेली बाटली फेकलेली आढळून आली. आज पहाटे फॉरेन्सिक , ठसेतज्ञ व श्वान पथक दाखल झाले . राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख - गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर - मनमाड महामार्गापासून काही अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता . काल ( रविवारी ) मध्यरात्रीच्या दरम्यान खूनाची घटना घडली असावी . स्थानिक शेतकरी विशाल गिते यांचे पोल्ट्रीसाठी मध्यरात्री दोन वाजता कोंबडी खाद्याचे वाहन येणार होते . त्यासाठी गिते नगर - मनमाड रस्त्याकडे दुचाकीवर चालले होते . दुचाकीच्या उजेडात त्यांना मृतदेह दिसला . त्यांनी तात्काळ पोलिसांच्या गस्ती पथकाला माहिती दिली .
पहाटे चार वाजता वाजता पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके , पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे , उपनिरीक्षक मधुकर शिंदे , उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ , कॉन्स्टेबल जालिंदर साखरे , वैभव साळवे , उत्तरेश्वर मोराळे , दिनेश आव्हाड , जानकीराम खेमनर , अण्णासाहेब चव्हाण , गृहरक्षक दलाचे सचिन पवार घटनास्थळी दाखल झाले . सकाळी नगरहून फॉरेन्सिक पथक , ठसेतज्ञ व रक्षा नावाच्या श्वानासह पोलीस पथक दाखल झाले . श्वानाने नगर - मनमाड रस्त्यावर पर्यंत माग दाखविला . घटनास्थळी आढळलेल्या फुटलेल्या दारूच्या बाटलीवरील ठसे व मृतदेहाच्या शेजारी पडलेल्या दगडावरील रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले . मृताच्या अंगावर पंजाबी ड्रेस असून , नारंगी रंगाची सलवार व गर्द आकाशी रंगाचा कुर्ता आहे . डाव्या हातावर मनगटाच्या खाली इंग्रजी अक्षरात  शितल  व डाव्या हाताच्या अंगठ्या खाली इंग्रजीत  एस.पी.  असे गोंदलेले आहे . मृताच्या पायातील चप्पल घटनास्थळी आढळली नाही .
आसपासच्या परिसरातील नागरिकांना तरुणीची ओळख पटली नाही . परिसरातील नगर - मनमाड रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून , तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत . याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

No comments:

Post a Comment