महिला दिनानिमित्त बुथ हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

महिला दिनानिमित्त बुथ हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा सन्मान

 महिला दिनानिमित्त बुथ हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा सन्मान

कोरोनाकाळात नवजीवन देण्याचे कार्य करणार्‍या महिलांच्या कार्याला सलाम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना महामारीच्या संकटकाळात कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या व निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करणार्‍या सॅलेवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटल मधील महिला डॉक्टर व परिचारिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता महामारीच्या काळात कोरोना रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य केल्याबद्दल हॉस्पिटलमधील महिलांच्या कार्याला सलाम करण्यात आले.  
डॉ.सिमरन वधवा यांच्या अध्यक्षतेखाली बुथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, मेजर ज्योती कळकुंबे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, स्वच्छता दूत शारदा होशिंग आदींसह डॉक्टर, परिचारिका व हॉस्पिटलच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
बुथ हॉस्पिटलच्या कॅप्टन जयमाला साळवे, डॉ.मीना फुके, डॉ.चैतन्या मंडलिक, डॉ.अलिशा मंडलिक, सिस्टर सत्वशीला वाघमारे, लता वाघमारे, सुनिता पारखे, मीना दौंडे, कल्पना साळवे, विद्या साळवे, महिमा पारखे, संजीवनी भोंगाळे, निर्मला कंदारे, विमल जाधव, अश्विनी बोधक, सिमरन घोडके, प्रेरणा वाघमारे, शालिनी कसबे, सपना चौहान, मारिया सोनवणे, नजमा आरिफ, शोभा जावळे यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हॅट, फ्लॉवर पॉट व पेन देऊन सन्मान करण्यात आला.
मेजर ज्योती कळकुंबे म्हणाल्या की, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व पुर्ण करण्यासाठी बुथ हॉस्पिटलने कोरोनाच्या महामारीत मानवसेवेचे निस्वार्थ भावनेने कार्य केले. मनुष्यबळ व भौतिक सोयी-सुविधा कमी असून देखील मोठ्या जिद्दीने व कष्टाने हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व कर्मचार्यांनी कोरोना रुग्णांचे जीव वाचविले. ज्येष्ठ परिचारिकांनी देखील दिलेली जबाबदारी स्वखुशीने सांभाळून कार्य केले. महामारीत आरोग्यसेवा देत असताना कुटूंबापासून लांब राहून महिलांनी मोठा त्याग दिला. आरोग्यसेवा देणार्या महिलांचा अफाट आत्मविश्वास व इच्छाशक्तीने कोरोनाशी लढता आल्याचे त्यांनी सांगितले. मेजर देवदान कळकुंबे यांनी स्त्री ही एक शक्ती असून, अनेक भूमिका बजावून आपली जबाबदारी पार पाडत असते. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. इवॅन्जलीन बुथ हॉस्पिटल हे एका महिलेच्या नावानेच असल्याचे अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.    
डॉ.सिमरन वधवा म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या संकटकाळात बुथ हॉस्पिटलने नागरिकांना मोठा आधार दिला. नागरिकांचे मनोधैर्य उंचावून, कोरोनाची भिती दूर करण्याचे काम केले. हॉस्पिटलमध्ये पुरेश्या सोयी-सुविधा नसताना देखील मनोबळ व इच्छाशक्तीद्वारे अनेक रुग्णांना बरे करण्याचे काम करण्यात आले. कोरोनाकाळात रुग्णसेवा करणार्या डॉक्टर व परिचारिका असलेल्या महिलांनी घरची जबाबदारी पार पाडून रुग्णसेवेचे कर्तव्य पार पडले. हे मोठ्या कष्टाचे काम होते. अनेकांनी कुटूंबापासून दूर विलगीकरणात राहून ही सेवा दिली. या महान सेवेतून त्यांची उतराई होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here