माजी खा. भाजपा नेते दिलीप गांधी याचं निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

माजी खा. भाजपा नेते दिलीप गांधी याचं निधन

 माजी खा. भाजपा नेते दिलीप गांधी याचं निधन

स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या पाठोपाठ हिंदुत्वाचा दुसरा शिलेदारही अनंतात विलीन!

दिल्लीत घेतला अखेरचा श्वास; उद्या दुपारी 4 वाजता अत्यंसंस्कार

साखर सम्राटांच्या अहमदनगर जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेला सत्ता स्थानी नेण्यात स्व. अनिल भैया राठोड व स्व. दिलीप गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे. या दोन्ही नेत्यांनी राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले हे दोन्ही नेते एकत्र असताना भाजपा-सेनेचा आलेख सतत उंचावत राहिला. या दोन्ही नेत्यात मतभेद निर्माण झाल्या नंतर भाजपा-शिवसेना दोन्ही पक्षात गटांनी शिरकाव केला. या गटतटाचा फटका दोघांनाही बसला. अनिल भैया राठोड यांना दोनदा विधानसभेत पराभव पत्करावा लागला. 2019 मध्ये पक्षाने दिलीप गांधींचे खासदारकीचे तिकीट कापले. अनिल भैय्या यांना पराभवाचे शल्य सतत बोचत राहिले. दिलीप गांधी यांना पक्षाने डावलले ही खंतही सतत अस्वस्थ करीत राहिली. कोरोनामुळे या दोन्ही नेत्यांचा मृत्यू झाला असला तरी सत्तेतील अपयश पचविणे दोन्ही नेत्यांना अवघड गेलं असं म्हणता येईल. दिलीप गांधी यांचं निधन हा हिंदुत्ववादी विचारांना मोठा धक्का आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील 1980 पासून भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणून ओळख निर्माण केलेले. संघाच्या मुशीतून संस्कार झालेले माजी केंद्रीय मंत्री खासदार दिलीप गांधी यांचे आज पहाटे दिल्लीत कोरोना मुळे दुःखद निधन झाले. पहाटे प्रसिद्धी माध्यमातून ही घटना नगरकरांना समजावल्यावर मोठा धक्का बसला. हिंदुत्ववादी शिलेदार अनिल भैय्या राठोड यांचा काही दिवसांपूर्वी कोरोना मुळेच मृत्यू व्हावा व दुसरे हिंदुत्ववादी शिलेदार दिलीप गांधी यांचा आज पहाटे कोरोना मुळेच मृत्यू व्हावा हा योगायोगच म्हणावा लागेल. अनेक वर्षे हिंदुत्वाचे झेंडा हाती घेतलेल्या या दोन्ही शिलेदारांच्या मृत्युमुळे नगरकरांची मोठी हानी झाली आहे.
ते 70 वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.प्रकृतीच्या तक्रारींमुळं त्यांनी अलीकडेच कोरोना चाचणी करून घेतली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते. तिथं काल दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. उद्या त्यांचं पार्थिव नगरला आणण्यात येणार असून उद्या त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गांधी यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करीत गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ’महाराष्ट्रात भाजपाला बळकट करण्यासाठी त्यांनी असंख्य प्रयत्न केले,’ असेही मोदी यांनी गांधी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं आहे. ’दिलीप गांधी यांनी संपूर्ण जीवन जनतेची सेवा करण्यासाठी समर्पित केले,’ असे गृहमंत्री अमित शहा यांनी गांधी यांना श्रद्धांजली वाहताना म्हंटले आहे. मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करीत दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ’भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीपजी गांधी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. ॐ शांती,’ असे ट्विट गडकरी यांनी केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलीप गांधी श्रद्धांजली वाहताना म्हंटले आहे की, ’गांधी यांनी शेतकरी व समाजातील इतर दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी काम केले.’

काँग्रेस विचारसरणी व साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्यात 1999, 2009, 2014 सलग 3 वेळा लोकसभेवर निवडून येण्याची किमया दिलीप गांधींनी साधली असताना 2019 मध्ये पक्षाने त्यांचे तिकीट कापून सुजय विखे यांना दिलं. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी ही समर्थकांची अपेक्षा असताना त्यांनी पक्ष निष्ठेला महत्त्व दिलं. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत व्यासपीठावर दिलीप गांधींना भाषण आटोपतं घेण्यास सांगितलं तेव्हा त्यांचे डोळ्यातील अश्रू नगरकरांनी पाहिले.. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. भावूक झालेल्या दिलीप गांधींना पाहून सुजय विखे ही हादरले. सुजय विखेंनी “सर तुम्ही बोला” अशी विनंती केल्यावर गांधी पुन्हा बोलायला लागले. संघाच्या मुशीत वाढलेल्या गांधींची भारतीय जनता पक्षावर प्रामाणिक निष्ठा व प्रेम होते. या निवडणुकीत सुजय विखेंच्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं. लालकृष्ण आडवाणी, अटल बिहारी वाजपेयी व पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे प्रेरणास्थान असल्याचं ते उल्लेख करीत असत. तळागाळातील जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख शेवटपर्यंत राहिली. खा. सुजय विखेंचा विजय झाल्यानंतर ही त्यांनी आनंद व्यक्त केला. अशा या नेत्याचे निधन हा भारतीय जनता पक्षालाच नव्हे तर नगरकरांना मोठा धक्का आहे.

दिलीप गांधी यांनी भूषविलेली पदे - 

नगरसेवक.
उपनगराध्यक्ष.
जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा.
खासदार -3 वेळा
जिल्हा सरचिटणीस
अर्बन बँक, संचालक
अर्बन बँक चेअरमन
शहर जिल्हा अध्यक्ष भाजपा
सदस्य, सल्लागार समिती, ग्रामीण विकास मंत्रालय.
सदस्य, सल्लागार समिती, मंत्रालय.
केंद्रीय जहाज राज्यमंत्री.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष.
सदस्य, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती.
सदस्य, नागरी विमान सल्लागार समिती.
सदस्य हौसिंग समिती.
चेअरमन, संसदीय अधीनस्थ, समिती.
सदस्य, संसदीय नगर विकास समिती.
सदस्य, संसदीय वित्तीय समिती.
सदस्य एम.पी. एल.एडी समिती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here