पारनेरने यापूर्वी चांगले काम केले आता आलेली मरगळ झटकून पुन्हा सज्ज व्हा ः भोसले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

पारनेरने यापूर्वी चांगले काम केले आता आलेली मरगळ झटकून पुन्हा सज्ज व्हा ः भोसले

 पारनेरने यापूर्वी चांगले काम केले आता आलेली मरगळ झटकून पुन्हा सज्ज व्हा ः भोसले

मास्क नाही तसे आढळल्यास दुकाने सील करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यादृष्टीने प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तालुका यंत्रणेने सतर्क होऊन आलेली मरगळ झटकून पुन्हा सर्व यंत्रणा कार्यान्वित गरजेचे आहे. दुसरी लाट घातक असण्याची शक्यता आहे ती वेळीच थोपवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. गेल्यावेळी कोरोना काळात तालुक्यात प्रशासनाने चांगल्या पद्धतीने काम केले होते, मात्र सध्या आलेली मरगळ झटकून पुन्हा कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज व्हा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी तालुक्यातील अधिकार्‍यांना केल्या आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याचा तालुकानिहाय दौरा सुरू केला आहे त्यानुसार पारनेर तहसील कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव बेळंबे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्यात आली व अधिकार्यांना सूचना करण्यात आल्या ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर संदर्भात तेथील व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना डॉ.भोसले यांनी तालुक्यात पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या वाढवाव्यात त्या व्यक्तींचे तत्काळ विलगीकरण करावे हि दुसरी लाट घातक आहे. सर्व यंत्रणेला सोबत घेऊन काम करावे.
प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस, आरोग्य अधिकारी यांनी दररोज समन्वय साधून बैठक घ्यावी त्यानुसार नियोजन करावे. कोविड संसर्ग नियंत्रण संदर्भात विविध विभागनिहाय सूचना केल्या. ‘नागरिकांनीही कोरोना साथ नियंत्रणासाठी नियमितपणे मास्क वापरणे, हात वेळोवेळी धुणे, सामाजिक अंतर राखणे, कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार चाचणी करुन औषधोपचार सुरू करणे,’ असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी केले.
जिल्हाधिकारी यांनी लसीकरण संदर्भात माहिती घेतली तसेच सर्व आरोग्य यंत्रणेला, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, पंचायत समिती या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लसीकरण करून घेणेबाबत सांगण्यात आले. मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी होम विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण यापुढील काळात करण्यात यावे, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडेल त्या घरावर पोस्टर लावून घरातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारून त्यांचे विलगीकरण करावे, व या संदर्भात नियम मोडणार्‍या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यात असणार्‍या सर्व सुविधा संदर्भात माहिती देत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पुन्हा तालुका यंत्रणा कार्यान्वित केली जाईल असे सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, पारनेर गटविकास अधिकारी किशोर माने, आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ.सुनिता कुमावत आदी उपस्थित होते.
लग्नसमारंभात गर्दी होत असल्यास होणार कारवाई मंगल कार्यालय येथे लग्न समारंभात जास्त संख्या आढळून आली तर त्यावर त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात यावी. जे लोक घरगुती पद्धतीने लग्न समारंभ करत आहेत मात्र तेथे 50 पेक्षा जास्त गर्दी होत आहे, त्याठिकाणी पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कंटेनमेंट झोन फक्त कागदावर नको !
तालुक्यात नऊ ठिकाणी कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत मात्र हे कंटेनमेंट फक्त कागदावर नको त्याचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे अशा सूचना दिल्या. तसेच पारनेर शहरातील सुतार गल्ली येथे असणार्‍या कंटेनमेंट झोनला जिल्हाधिकारी यांनी स्वतः भेट देत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

दुकानात विनामास्क व्यक्ती
आढळल्यास दुकाने सील...

शहरातील बाजारपेठा दुकाने यामध्ये मास्क नसेल तर प्रवेश नाही तसेच त्या ठिकाणी मास्क न लावणार्‍या व्यक्ती आढळून आल्यास त्या दुकानावर कारवाई करून ते दुकान सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले आहेत.
सध्याच्या स्थितीमध्ये नगर जिल्ह्यातील रहिवासी मास्क व सोशल डिस्टन्स वापर करत आहेत मधल्या काळामध्ये शिथिलता आली होती, पण वाढते रुग्ण संख्येमुळे नागरिकही सतर्क झाले आहेत. कंटेनमेंट झोनचे काटेकोरपणे पालन करणे, मास्क जास्तीत जास्त वापर करणे, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटर तसेच तपासणी केंद्राची संख्या वाढविण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या आहेत, कोरोना काळामध्ये तालुकाप्रशासकीय प्रमुख म्हणून तहसीलदार यांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत.                     - डॉ.राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी अहमदनगर

No comments:

Post a Comment