शेततळे, कांदा चाळ, फळबाग कामात निधीचा अपहार झाल्याप्रकरणी शेतकर्‍यांचे उपोषण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

शेततळे, कांदा चाळ, फळबाग कामात निधीचा अपहार झाल्याप्रकरणी शेतकर्‍यांचे उपोषण

 शेततळे, कांदा चाळ, फळबाग कामात निधीचा अपहार झाल्याप्रकरणी शेतकर्‍यांचे उपोषण

संबंधित अधिकारी, कर्मचारी व बोगस लाभार्थींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः बोगस लाभार्थींशी संगनमत करुन मौजे पिंपरखेड (हसनाबाद ता. जामखेड) येथे जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शेततळे, कांदा चाळ, फळबाग यांची कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करुन सबंधितांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी बापूसाहेब शिंदे या शेतकर्याने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण केले.
मौजे पिंपरखेड (हसनाबाद ता. जामखेड) येथे 2017-18 व 2018-19 या काळात जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून शेततळे, कांदाचाळ, फळबाग यांची कामे न करताच कागदोपत्री झाल्याचे बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हडप करण्यात आला असून, सदर प्रकार जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेल्या माहितीवरुन दि.8 जानेवारी 2021 रोजी उघडकीस आला आहे. या भागातील शेततळे, कांदा चाळ, फळबाग यांची कामे प्रत्यक्षात न करता कागदोपत्री दाखवण्यात आले असल्याचा बापूसाहेब शिंदे यांचा आरोप आहे.
 तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करुन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर करणार्या जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व बोगस लाभार्थींवार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली. कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सोमवार दि.22 मार्च पासून तक्रारीची तपासणी सुरु करुन त्याचा अहवाल दि.5 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते शिंदे यांनी आपले उपोषण संध्याकाळी उशीरा जामखेड पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे यांच्या उपस्थितीत मागे घेतले. यावेळी कृषीचे तंत्र अधिकारी बाळासाहेब नितनवरे, कृषी सल्लागार संग्राम भिंगारदिवे, अशोक धेंडे, संदीप बोराटे, दत्ता गिरी, पोलीस नाईक भारत गाडीलकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here