अद्ययावत उपचार व तपासणी केंद्रामुळे रूग्णांना परगावी जाण्याची गरज नाही : डॉ. बलसारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

अद्ययावत उपचार व तपासणी केंद्रामुळे रूग्णांना परगावी जाण्याची गरज नाही : डॉ. बलसारा

 अद्ययावत उपचार व तपासणी केंद्रामुळे रूग्णांना परगावी जाण्याची गरज नाही : डॉ. बलसारा

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमिया रूग्णांसाठी मोफत डे केअर सेंटर कार्यान्वीत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः थॅलेसेमिया रूग्णांना चांगले उपचार व सेवा मिळण्यासाठी जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये ऋतुजा फौंडेशनच्या सहकार्यातून जिल्ह्यातील पहिलेच थॅलेसेमिया डे केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांचे सुशिष्य प्रबुध्दविचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांच्या दिक्षादिनी मंगळवारी या सेंटरचे उद्घाटन पारस उद्योग समूहाचे पेमराज बोथरा व कोहिनूरच्या श्रीमती नीताभाभी गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी रक्तविकार तज्ज्ञ डॉ.लिझा बलसारा-गवळी, ऋतुजा फौंडेशनच्या डॉ.अंजली केवळ, समता फौंडेशनचे मोहन केंद्रे, ज्ञानेश्वर चव्हाण, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर, सिव्हिल हॉस्पिटलचे ज्ञानेश्वर मगर, आशिष इरमल, डॉ.रवीराज गवळी,  बालरोगतज्ज्ञ डॉ.वैभवी वंजारे, डॉ.प्रकाश कांकरिया, संतोष बोथरा निखीलेंद्र लोढा, सतीश लोढा, प्रकाश छल्लानी, मनिषा बोथरा, मनिषा लोढा, डॉ.आशिष भंडारी, थॅलेसेमियाग्रस्त बालकाचे पालक सुदाम शिंदे, सुनिल महानोर आदी उपस्थित होते.
डॉ.बलसारा यांनी सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील या डे केअर सेंटरमध्ये थॅलेसेमिया रूग्णांना दर 21 दिवसांनी मोफत ल्युकोसाईट फिल्टर रक्त संक्रमण केले जाणार आहे. या डे केअर सेंटरमध्ये रूग्णाला आवश्यक असलेल्या दर महिन्याच्या, तीन महिन्याच्या तसेच दरवर्षीच्या रक्त तपासण्याही पूर्ण मोफत केल्या जाणार आहेत. डेक्झा स्कॅन आणि टी 2 स्टार एमआरआयसारख्या तपासण्याही याठिकाणी सवलतीच्या दरात केल्या जातील. त्यामुळे रूग्णांना या तपासण्यासाठी पुणे,मुंबई, नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही.  दहा खाटांच्या या डे केअर सेंटरमध्ये पुढील महिन्यात थॅलेसेमिया मायनर टेस्ट कॅम्प, एचएलए टायपिंग टेस्ट कॅम्प सुध्दा घेण्यात येणार आहे. याशिवाय रूग्णांना समुपदेशक, फिजिओथेरपीस्ट व आहारतज्ज्ञांचेही याठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे. जास्तीत जास्त थॅलेसेमिया रूग्णांना या अद्ययावत सेंटरचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहिल.
सेंटरबाबत माहिती देताना डॉ.आशिष भंडारी यांनी सांगितले की, एनजीओमार्फत चालवले जाणारे नगर जिल्ह्यातील पहिले थॅलेसेमिया डे केअर सेंटर आनंदऋषीजी हॉस्पिटलने सुरु केले आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. जिल्ह्यातील पहिल्या रक्तविकार तज्ज्ञ डॉ.लिझा बलसारा या हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ उपलब्ध झाल्याने थॅलेसेमिया रूग्णांसाठी हे सेंटर सुरु करण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली व आज ते प्रत्यक्ष कार्यान्वीत झाले आहे. डॉ.अंजली केवळ यांनी सांगितले की, माझी स्वत:ची मुलगी थॅलेसिमियाग्रस्त आहे. त्यामुळे अशा रूग्णांची व नातेवाईकांची अवस्था काय होते हे जवळून अनुभवते आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलचे सेवाकार्य अनेक वर्षांपासून जवळून पाहत आहे. त्यामुळेच याठिकाणी थॅलेसेमिया विभाग सुरु करण्यासाठी ऋतुजा फौंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेतला. संतोष बोथरा यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले तर  आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले.

No comments:

Post a Comment