धर्मनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले तांदळी वडगांव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

धर्मनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले तांदळी वडगांव

 धर्मनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले तांदळी वडगांव


गर शहरापासून 23 कि.मी.अंतरावर सोलापूर महामार्गालगत असलेले तांदळी वडगांव हे धर्मनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले गांव.  श्रीगुरूगोरक्षनाथ यांचे शिष्य श्रीधर्मनाथ. माघ महिन्यातील शुध्द व्दितीयेला श्रीगुरूगोरक्षनाथांनी काशीक्षेत्री श्रीधर्मनाथांना अनुग्रह दिला. याप्रसंगी श्रीमच्छिंद्रनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथांसह देव-गंधर्व अन् प्रजाजन उपस्थित होते. या सर्वांना श्रीगुरूगोरक्षनाथांनी स्वतः आंबिल व घुग-यांचा प्रसाद वाटला. श्रीधर्मनाथांच्या दिक्षेची स्मृती म्हणून माघ शुध्द व्दितीया हि तिथी धर्मनाथ बीज या नावाने अखिल भारतभर श्रध्देने साजरी केली जाते. शनिवारी दि. 13 फेब्रुवारी 2021 ला धर्मनाथ बीज आहे. आपआपल्या घरी धर्मनाथ बीज साजरी करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा नाथभक्त जतन करताना दिसतात. घरात समृध्दी, शांतता, निरामयता नांदावी म्हणून धर्मनाथ बीज आजच्या संगणक युगातही साजरी केली जाते, हा नाथपंथाचा महिमा आहे.
श्री नवनाथ भक्तिसार या प्रासादिक ग्रंथामधील 32 व 33 व्या अध्यायात श्रीधर्मनाथांबद्दल माहिती मिळते. नाथपंथाच्या दिक्षाविधीनंतर श्रीधर्मनाथ आई रेवतीचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथांचे बोट धरून निघाले. तिर्थाटन करत-करत बद्रिकाश्रमामध्ये पोहोचल्यावर गुरूआज्ञेने तपास बसले. 12 वर्षांचे तप पूर्ण झाल्यावर श्रीधर्मनाथांनी श्रीगुरूगोरक्षनाथांचा आदर्श समोर ठेवून नाथ संप्रदायाच्या कार्याचा सर्वदूर प्रसार केला. याच कालावधीत ते तांदळी वडगाव येथे आले असावेत. चिखली घाटात उगम पावणा-या बांगरी नदीच्या तीरावरील या गावाचा परिसर त्यांना आवडल्याने सोबतच्या नाथसिध्दांसह ते काही दिवस येथे राहिले असतील. श्रीधर्मनाथ जेथे राहिले ते तांदळीतील विश्रांतीस्थान पंचक्रोशीचेच नव्हे तर अवघ्या नाथभक्तांचे श्रध्दास्थान झाले. तांदळीचे धरमराया म्हणून याक्षेत्राची ख्याती झाली.
श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथामधील 40 व्या अध्यायामध्ये शके सत्राशे दहापर्यत प्रकटरूपे मिरवले नाथ असे म्हटलेले आहे. तांदळी-वडगाव येथे श्रीधर्मनाथ येऊन गेल्याची आख्यायिका लक्षात घेता शके सत्राशे दहापूर्वीच ते येथे येऊन गेले हे स्पष्ट आहे. 40 व्या अध्यायामध्येच धर्मनाथ स्वसामर्थ्ये वैकुंठात गेले असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांची समाधी पृथ्वीतलावर कोठे असणे शक्यच नाही! येथील नाथपंथी पध्दतीच्या दगडी बांधणीतील मंदिराचे प्रवेशव्दार एका व्यक्तीलाच आत जाता येईल, असे आहे. गर्भगृहात एकाचवेळी पाच जण बसू शकतात. या मंदिराजवळच असलेल्या भगवान श्रीदत्तात्रेय मंदिराच्या बाजूने एक देवळीसारखा कोनाडा आहे. महिलांना दर्शन घेण्याची ही सुविधा मंदिराची उभारणी करतानाच केलेली दिसते. श्रीधर्मनाथांच्या सोबत असलेले नाथसिध्द येथे राहिले ती आठवण म्हणून मंदिराच्या मागील बाजूला प्रतीकस्वरूप दगडी गोटे दाखवत अत्यंत श्रध्देने याविषयीची आख्यायिका आजही सांगितली जाते. नाथपंथी मठ व मंदिरांबाहेर बहुतेक ठिकाणी शिळा पहावयास मिळतात. श्रीधर्मनाथ मंदिरामागे शिळेऐवजी ओबड-धोबड गोटे आहेत. या समोर मंदिराची 32 एकर इनामी जमिन असून ठोका ( लिलाव ) पध्दतीने ती तीन वर्षांकरिता कसण्यासाठी दिली जाते. ठोक्याची रक्कम देवस्थानला अर्पण करण्यात येते. इनामी जमिन श्रध्देने जपणा-या येथील ग्रामस्थांनी आपल्या कृतीमधून अनोखा आदर्शच उभा केला आहे!
आणखी एक विशेष म्हणजे श्रीधर्मनाथांची दैनंदिन पुजा-आरती सेवा भावनेने करण्याची येथील परंपरा आहे. येथे सेवेस जे रहातात. त्यांच्या रहाण्याचा-खाण्या-पिण्याचा खर्च गांवकरी सांभाळतात. कोणीही पगार मागत नाही. महंत सहजनभारती, महंत रामभारती, महंत नामदेवभारती, महंत खुशालभारती, महंत शंकरभारती यांच्यासह महंत ओमभारती यांनी येथे सेवा केल्या. कुटे बाबांनीही बरीच वर्षे सेवा केली. आज सेवेत असलेले श्री.मारूती महाराज शिंदे हे 82 वर्षांचे आहेत. मंदिराच्या सेवेकरी मंडळींसाठी गावात मठ आहे. अलिकडे या मठाची पडझड झाल्याने मंदिराजवळच सेवेक-यांसाठी खोल्या उभारण्यात आल्या आहेत.
या मंदिरासमोर साधारणतः 100 फुटांच्या अंतरावर दोन विहिरी आहेत. भंडा-याच्या कार्यक्रमासाठी या विहिरींची पूजा करून श्रीधर्मनाथांचा गजर करताच विहिरींमधून स्वयंपाकासाठीची भांडी प्रकट व्हायची. भंडारा झाल्यावर ही भांडी विहिरीतील पाण्यात सोडली की गायब व्हायची, असे सांगणारे ज्येष्ठ नागरिक पंचक्रोशीत फेरफटका मारला की भेटतात! घरातील आजारी व्यक्तीस श्रीधर्मनाथांच्या दर्शनास आणले की आजार पळून जाण्याच्या घटना घडत असत. आजारी जनावरेही  श्रीधर्मनाथांच्या दर्शनाला आणली की आजारमुक्त होत. नाथपंथी धुनीमधील ऊदीचे सामर्थ्यच अलौकीक असते याचे प्रत्यंतर आजही येथे येते.
मंदिरासमोर प्रशस्त सभामंडप उभारण्यात आला असून मंदिराच्या जिर्णोध्दाराचे कामही लोकवर्गणीमधून हाती घेण्यात येणार आहे. श्रावण महिन्यात येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहाची सांगता बाजरी, ज्वारी, गहू भरडून तयार केलेल्या कण्या व येसुराची आमटी या वैशिष्ट्यपूर्ण महाप्रसादाने करण्यात येते. धर्मनाथ बीजेला ज्वारीचे पीठ, ताक, तिखट व मीठ एकत्रित केलेले आंबिल व घुगर्‍यांचा प्रसाद वाटण्यात येतो.
श्रीधर्मनाथ बीजेचे औचित्य साधून किंवा आपल्या सवडीनुसार पंचक्रोशीमधील भाविक अगदी सहकुटूंब  श्रीधर्मनाथांच्या दर्शनाचा आनंद घेतात.
- मिलिंद सदाशिव चवंडके
 नाथ साहित्य अभ्यासक, अहमदनगर.

No comments:

Post a Comment