आंदोलक शेतकरी याच देशाचे नागरिक आहेत ः क्षीरसागर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

आंदोलक शेतकरी याच देशाचे नागरिक आहेत ः क्षीरसागर

 आंदोलक शेतकरी याच देशाचे नागरिक आहेत ः क्षीरसागर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आंदोलनजीवी, खलिस्तानी, देशद्रोही अशी निर्भत्सना केली जात असलेले भूमिपुत्र शेतकरी याच देशाचे नागरिक आहेत. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. आंदोलनांनी व चळवळीनी या देशाला स्वातंत्र मिळवून दिले आहे हे आपण विसरता कामा नये. आता शेतकरी आंदोलनाबाबत जे लिहिले बोलले जात आहे हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे. असे विचार शेतमजूर नेते कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, मध्ये कॉम्रेड एकनाथराव भागवत यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वाद विवाद व वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. सुरवातीला कॉम्रेड सुरेश संत यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. लोकशाहीमध्ये जनतेला विश्वासात न घेता कायदे तयार केले जाणे अपेक्षित नसते. याचा सखोल विचार तरुणांनी करावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी तरुणांना केले. यावर्षी स्पर्धेचे हे बत्तिसावे वर्ष आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नंदकुमार झावरे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड भागवतांसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या पुरोगामी विचारांची आज गरज आहे अशी भावना व्यक्त केली. आपणही चळवळी व विद्यार्थी आंदोलनातून नेतृत्वकरत इथपर्यंत वाटचाल करत आलेलो आहोत असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अ.जि.म.वि.प्र.समाज संस्थेचे उपाध्यक्ष मा. रामचंद्र दरे, संस्थेच्या कार्यकारणी सदस्या मा. निर्मलाताई काटे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे. तसेच शेवगाव,पाथर्डी, नगर येथील भागवतांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मा. डॉ. बी.एच. झावरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ येठेकर यांनी तर आभार डॉ. मीना साळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कलाशाखेचे उपप्राचार्य प्रा. बी. बी. सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंधरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डी. के. मोटे हे ही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment