पोलीसमित्र अविनाश देवगावकरांचा, रेडिओ नगर कडून गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

पोलीसमित्र अविनाश देवगावकरांचा, रेडिओ नगर कडून गौरव

 पोलीसमित्र अविनाश देवगावकरांचा, रेडिओ नगर कडून गौरव


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील बहुतांश चौकात हातात काठी घेऊन शिट्टीचा आवाज करीत ठप्प झालेली ट्रॅफिक सुरळीत करणारा पोलिस मित्र म्हणजे अविनाश देडगावकर. त्यांची कौटुंबिक माहिती असलेले अनेक जण त्यांना काहीबाही बोलतात. पण कोणी निंदा वा कोणी वंदा.. म्हणत समाजसेवा व वाहतूक नियंत्रित करण्याच्या सेवेत सतत कार्यरत असण्याचा वसा त्यांनी सोडलेला नाही.
अविनाश देडगावकर यांच्या या समाज कार्याची दखल घेत देडगावकर यांच्याशी नुकताच रेडिओ नगर 90.4 एफ. एमच्या टीमने मुलाखतीद्वारे संवाद साधला. नगर मधील प्रसिद्ध अशा देडगावकर सराफ परिवारातील सदस्य असलेले अविनाश देडगावकर यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या कौटुंबिक संपन्नतेची जाणीव होत नाही. डोक्यावरचे पिकलेले केस व अंगावर साधेसे कपडे परिधान करणारे देडगावकर गेल्या 35 ते 40 वर्षापासून छोट्या-मोठ्या सामाजिक कामात आहेत. नगरमध्ये जशी वाहनांची संख्या वाढू लागली व विविध चौकातून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढू लागले, तसे देडगावकरांनी पोलिसाच्या मदतीला धावणे पसंत केले. कोणाच्याही आमंत्रणावीना वा कोणत्याही ही मानधनाविना रोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत देडगावकर इमाने-इतबारे शहराच्या विविध चौकांतून ट्रॅफिक कंट्रोलिंगचे काम शहर वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून करतात. या निःस्वार्थी सेवेमुळेच त्यांना पोलीस मित्र पुरस्कार पोलिसांनी स्वतःहून दिला आहे. याशिवाय नगर कॉलेज, रोटरी क्लब सह अनेक संस्थांनीही त्यांना समाजभूषण, समाजरत्न, नगर गौरव असे विविध पुरस्कारही दिले आहेत.
इम्पीरियल चौक, चांदणी चौक, जीपीओ चौक, एसपी ऑफिस चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक तसेच शहरांतर्गत कापड बाजार, निलक्रांती चौक, दिल्लीगेट, स्वास्तिक चौक, सक्कर चौक ही नगरमधील नेहमी वाहतूक ठप्प होणारी ठिकाणे. दिवसभर यापैकी कोणत्या ना कोणत्या चौकात रस्त्याच्या मधोमध थांबून ठप्प झालेल्या वाहतुकीला रस्ता करून देताना देडगावकर दिसतात. वाहतूक पोलीस कधी त्यांच्या बरोबर असतात, तर कधी रस्त्याच्या कडेला असतात. अशावेळी आपल्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करणारा कोण हा उपटसुंभ असा वाहनचालकांना प्रश्न पडतो. काहीजण त्यांची हेटाळणी करतात. दमात घ्यायचा प्रयत्न करतात. पण साहेब, मॅडम म्हणत वाहतुकीचे नियम पाळा, नीट वाहन चालवा, तुम्हीही नीट जा व दुसर्‍यांनाही नीट जाऊद्या, अशा सभ्य व प्रेमाच्या भाषेत देडगावकर समजावून सांगतात मग वाहनचालकांनी आपलेच काहीतरी चुकल्याचे उमजून सॉरी सॉरी म्हणत व स्मितहास्य करीत देडगावकरांना धन्यवाद देतात. ट्रॅफिक वॉर्डनची टोपी, हातात काठी, तोंडात शिट्टी व गळ्यात आयकार्ड असल्याने आता देडगावकरांचे वाहतूक कोंडीला अस्तित्व नगरकरांनाही हवेहवेसे वाटू लागले आहे. वाहतूक ठप्प झाली की, वाहनचालकांची नजर देडगावकरांना शोधताना दिसते. खरंतर अशा निरपेक्ष सेवेला बर्‍याचदा वेडेपणा म्हटले जाते. पण असा वेडेपणा समाजहितासाठी असल्याचे वास्तव मात्र आपल्याला नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here