शब्दालय प्रकाशनास शासनाचा श्री. पु. भागवत पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

शब्दालय प्रकाशनास शासनाचा श्री. पु. भागवत पुरस्कार

 शब्दालय प्रकाशनास शासनाचा श्री. पु. भागवत पुरस्कार

रंगनाथ पठारे यांना वि.दा.करंदीकर जीवन गौरव पुरस्कार  


मुंबई ः
मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारया ज्येष्ठ साहित्यिकास राज्य शासन मराठी भाषा विभागातर्फे दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, कथा- कादंबरीकार, समीक्षक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे.
त्याच सोबत श्री. पु. भागवत पुरस्कार अहमदनगरमधील श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशनास तसेच कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार संजय भगत आणि मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश यांना आणि मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर करण्यात असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी मंत्रालयात केली.  रोख रक्कम, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
साहित्य क्षेत्रात दमदार कथा, कादंबरी आणि परखड समीक्षक म्हणून प्रा. रंगनाथ पठारे ओळखले जातात. त्यांनी शासनाच्या अभिजात मराठी भाषा समिती व उप समितीचे अध्यक्ष पद भूषविले आहे. तसेच साहित्य अकादमीसाठी त्यांनी भाषा सल्लागार, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष तसेच सदस्य अशा पदांचे कामकाज पाहिले आहे. 1999 मध्ये त्यांच्या ताम्रपट या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. अनेक कथा आणि कादंबरी त्याच्या लोकप्रिय ठरल्या आहेत.  
नगरमधील शब्दालय प्रकाशन संस्थेने राज्यात अनेक ठिकाणी आणि गोव्यात पुस्तक प्रदर्शने भरवून साहित्य सेवा दिली आहे. शब्दालयाचा प्रसिद्ध होणार शब्दालय दिवाळी अंक लोकप्रिय आहे.
मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश ही संस्था प्रकाशन, चर्चासत्र, नियतकालिके अशा उपक्रमातून नेहमीच कार्यरत आहे.
शासनाचा परिभाषा कोश संगणकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध व्हावा म्हणून संजय भगत यांनी विशेष कार्य केले आहे.
तसेच डॉ. सुधीर रसाळ हे मराठवाडा विद्यापीठात गेली पस्तीस वर्ष मराठीचे अध्यापन करतात.

No comments:

Post a Comment