विद्यार्थ्यांनी नगरच्या आकाशात अनुभवला राफेल व सुकाई फायटर्सचा रोमांचक थरार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

विद्यार्थ्यांनी नगरच्या आकाशात अनुभवला राफेल व सुकाई फायटर्सचा रोमांचक थरार

 विद्यार्थ्यांनी नगरच्या आकाशात अनुभवला राफेल व सुकाई फायटर्सचा रोमांचक थरार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः 1971मधील भारत-पाक युद्धात भारतीय सशस्त्र सैन्यांनी केलेल्या अतुल्य पराक्रमाला 50 वर्षे झाली असून, देशभरात आपल्या सशस्त्र सेना हे ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरा करीत आहेत, तसेच कोरोना महामारीनंतर झालेल्या लॉकडाऊनमधून देश पुन्हा कार्यरत होत आहे. मुलांच्या शाळा व अभ्यास हळूहळू पूर्ववत होत आहे. स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधून युद्धात आपल्या सैन्यांनी केलेला पराक्रम सांगून, कोरोना परिस्थितीत आपल्या भावी पिढीत एक वेगळे चैतन्य व विद्यार्थ्यांमध्ये एक नवी उभारी निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि आपल्या देशाजवळ असलेली शक्तिशाली शस्त्रांची ओळख करून त्यांचा विश्वास उत्तेजित करण्यासाठी नगरमधील सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासाठी सोलापूर रोडवरील वाळुंज येथील नालंदा स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे ‘एरो मॉडलिंग शो’ व वर्कशॉप नुकताच संपन्न झाला.
  यावेळी प्रसिद्ध एरो मॉडेलर सदानंद काळे, संस्थेचे अध्यक्ष यशवंत बहादुर्गे, संचालक पल्लवी बहादुर्गे, प्राचार्या डिसुझा, गौतम बहादुर्गे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध एरो मॉडेलर सदानंद काळे यांनी सर्वांना स्वनिर्मित फायटर विमानांच्या मॉडेलवर विमानात गती व शक्ती कशा निर्माण होतात व त्यावर कसे नियंत्रण ठेवून युध्द लढले जाते, याबद्दल माहिती दिली. त्यानंतर आपल्या वायू सेनेच्या राफेल व सुकाई विमानांच्या मॉडेल्स आकाशात उडवून एक रोमांचक थरार निर्माण करून विद्यार्थी व पालकांची वाहवा मिळविली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वत: एरो मॉडेल कसे तयार करायचे, याबद्दल प्रात्यक्षिक व मार्गदर्शक वर्कशॉप घेण्यात आले.
नालंदा स्कूल व समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष कर्नल यशवंत बहादुर्गे यांनी 71च्या लढाईत ते कार्यरत असलेल्या भारतीय वायू सेनेच्या 16व्या स्कॉड्रन (क्रोबा स्कॉड्रन)च्या कॅनबरा या मेडियम बॉम्बर विमानांनी विंग कमांडर पी. गौतम यांच्या नेतृत्वात पाकिस्तानमधील महत्वाच्या हवाईअड्डयांना अचूक बॉम्बिंगने कसे निकामी केले व त्यांना भारत सरकारने
    महावीर चक्र व सोबतच स्कॉड्रनला दोन वीर चक्रांनी सन्मानित केले, याबद्दल सांगून सर्वांच्या मनात एक प्रकारचा देशप्रेमी उत्साह निर्माण केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाडस व शौर्याचे बीजरोपण होण्यास मदत झाली.
   पालकांसाठी काही मनोरंजक खेळ यावेळी घेण्यात आले. त्यानंतर नालंदा स्कूलच्या निसर्गरम्य वातावरणात उपस्थितांनी वनभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. उत्कृष्ट कार्यक्रम आयोजनाबद्दल नालंदा स्कूलचे उपस्थितांनी कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.

No comments:

Post a Comment