कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ मोबाइल टॉवर कंपन्यांविरोधात कामगारांचा आंदोलनाचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 17, 2021

कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ मोबाइल टॉवर कंपन्यांविरोधात कामगारांचा आंदोलनाचा इशारा

 कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ मोबाइल टॉवर कंपन्यांविरोधात कामगारांचा आंदोलनाचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मोबाईल कंपन्यांसाठी टॉवर सेवा पुरविणार्‍या एटीसी व इंडस कंपनीने मागील वर्षभरात राज्यातील सुमारे सातशे कामगारांना कामावरुन कमी केले आहे . या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा मोबाइल टॉवर टेक्निकल असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला .
कामगारांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात टॉवर असोसिएशनच्या वतीने कायदेशीर सल्लागार अँड . श्रीरंग गिते यांनी भूमिका मांडली. जून 2020 ते जानेवारी 2021 या दरम्यानच्या काळात मोबाइल कंपन्यांना टॉवर सेवा पुरविणार्‍या एटीसी व इंडस कंपनीने राज्यातील 700 कामगारांना कोणतीही पुर्व सुचना न देता कामावरून काढून टाकले आहे. तर काही कामगारांची पिळवणूक सुरू आहे. यामध्ये पगार थकविणे, दूरच्या ठिकाणी बदली करणे, दमदाटी करून राजीनामे घेण्याचे प्रकार कंपन्यांकडून सुरु आहेत. कामगार कायद्यानुसार कामगारांना कामावरून काढून टाकताना रीतसर एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. कामगाराच्या सेवेनुसार मोबदला दिला जातो. याबाबत कंपन्यांकडून कोणतीच कार्यावाही केली गेली नाही.
कोरोनामुळे लॉक डाऊनच्या काळात सर्व सेवा ठप्प झाल्या असताना केवळ मोबाइल सेवा नियमितपणे सुरु होती . यासाठी याच कामगारांनी अहोरात्र चोवीस तास काम केले . मात्र लॉक डाऊन नंतर कामगारांना काढून टाकण्याचा सपाटाच कंपन्यांनी लावला आहे . नगर , औरंगाबाद , नागपूर , जालना , ठाणे , पूणे , सातारा , कोल्हापूर , ठाणे आदी जिल्ह्यातील कामगारांना काढून टाकले . या अन्यायाविरोधात मोबाइल टॉवर असोसिएशन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार आहे .
याबाबत मुख्यमंत्री , कामगार विभाग व संबंधीत कंपन्यांना पत्र पाठवले असून , येत्या पंधरा दिवसात कामगारांना काढून टाकण्याची प्रक्रिया थांबवावी . अन्यथा कंपन्यांविरोधात कामगारांसह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल . असा इशारा खेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here