2 किलो सोने पुरून मंत्रोपचारासाठी 25 लाख खर्च.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

2 किलो सोने पुरून मंत्रोपचारासाठी 25 लाख खर्च..

 2 किलो सोने पुरून मंत्रोपचारासाठी 25 लाख खर्च..

न्यायधीशासह विश्वस्तांवर गुन्हा दाखल !

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी देवस्थानच्या तत्कालीन विश्वस्थ मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात सुमारे 2 किलो सोने पुरून त्यावर मंत्रोपचारासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
   अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटादेवी मंदिरात दोन किलो सोने पुरून त्यावर मंत्र उपचाराच्या नावाखाली 25 लाख रुपये खर्च केल्याने दोषींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. दरम्यान मोहटा देवीच्या 2010 चे तत्कालीन देवस्थान समितीचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्यासह विश्वस्त मंडळ व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात कट रचून आर्थिक फसवणूक करणे व अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी, कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळी जादु नियम 2013 कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात सह अहमदनगर जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि माहूरच्या रेणुका मातेचे माहेरघर म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेले मोहटा देवी देवस्थान प्रसिद्ध आहे अहमदनगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.2010 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी मंदिर बांधताना मंदिराच्या पायामध्ये 1890 ग्रॅम सोनं पुरलं होतं. हे सोनं पुरताना त्याच्यावर मंत्रोच्चार देखील करण्यात आले आणि या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च करण्यात आला. या सर्व अंधश्रद्धेमुळे केल्यामुळे तत्कालीन विश्वस्त प्रकाश गरड यांनी आवाज उठवला आणि न्यायालयात याचिका दाखल केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने नगरच्या पोलीस अधीक्षकांकडे 7 मार्च 2017 रोजी तक्रार करून या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, तो गुन्हा आजतागायत दाखल झाला नव्हता. कारवाई होत नसल्याने देवस्थानचे माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना ‘अंनिस’ने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करा, असा आदेश न्यायालयाने 3 फेब्रुवारीला दिला.
   त्यानुसार अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, बाबा अरगडे, ड. रंजना गवांदे, डॉ. प्रकाश गरुड, अर्जुन हरेल यांचे निवेदनच फिर्याद म्हणून दाखल करून घेण्यात आले. यात अविनाश पाटील हे फिर्यादी असून, तत्कालीन जिल्हा न्यायाधीश न्हावकर यांच्यासह इतर विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपवनसंरक्षक असे पाच पदसिद्ध तर प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी नियुक्त केलेले इतर दहा असे एकूण पंधरा विश्वस्त कार्यरत असतात.
   या गुन्ह्यात न्यायाधीश न्हावकर यांच्यासह इतर विश्वस्तांना आरोपी करण्यात आले आहे. हे सोने पुरताना सोलापूरचे पंडित प्रदीप जाधव यांना मजुरी म्हणून 24 लाख 85 हजार रुपये व 1 किलो 890 ग्रॅम सोने विनानिविदा देण्यात आले होते, वास्तुविशारद रवींद्र शिंदे यांनी सुवर्णयंत्रांबाबतचा प्रस्ताव देवस्थानला दिल्याचे ठरावांमध्ये दिसते. सुवर्णयंत्रांवरील मंत्रोच्चारासाठी गोरचन, कस्तुरी यांसारख्या महागड्या जिनसा वापरण्यात आल्या आहेत. त्या कोठून पैदा झाल्या? हीही बाब या तपासात महत्त्वाची मानली जाते. गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment