योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन राज्यात जिल्हा अव्वल राहील ः मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन राज्यात जिल्हा अव्वल राहील ः मुश्रीफ

 योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन राज्यात जिल्हा अव्वल राहील ः मुश्रीफ

प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन अहमदनगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल राहील, ग्रामविकास आणि शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करीत अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने सर्वांनी आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते येथील पोलीस परेड मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले,  गेले जवळपास वर्षभर आपण कोरोनासारख्या महामारीशी सामना करत आहोत. कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून आपण कोरोनाला हरवण्याची लढाई सुरु केली आहे. मात्र, ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे. कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना आपण शेतकर्यांना बळ दिले. जिल्ह्यातील 2 लाख 84 हजार 868 शेतक-यांना 1 हजार 727 कोटी रुपये कर्जमुक्तीचा लाभ  मिळाला. मागील खरीप हंगामात शेतक-यांना 3 हजार 123 कोटी  रुपयांचे कर्जवाटप केले. यावर्षी अधिकाधिक आणि वेळेवर कर्ज वाटप करण्याच्या सुचना बँकांना दिल्या आहेत. अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतक-यांना 228 कोटीहून अधिक अनुदान वितरित करण्यात आल्याचे ते म्हणाले. विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एकूण 1400 ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यात शिवभोजन योजनेच्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये 9 लाख 50 हजाराहून शिवभोजन थाळ्यांच्या माध्यमातून अनेक गरीब आणि गरजूंना आधार मिळाला. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत आहे. शिधापत्रिकांचे संगणकीकरण केल्यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्य पुरवठा करणे सुलभ झाला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here