प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसा दुर्दैवी, देशाला काळिमा फासणारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसा दुर्दैवी, देशाला काळिमा फासणारी

 प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसा दुर्दैवी, देशाला काळिमा फासणारी

शेतकरी हिंसक आंदोलनानंतर केंद्र सरकारची आज उच्चस्तरीय बैठक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. ठिकठिकाणी आंदोलक शेतकर्‍यांनी बॅरिकेट्स तोडत दिल्लीमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी या आंदोलकांना अडवण्यासाठी अश्रुधुर आणि लाठीचार्जचा वापर केला. दिल्लीमध्ये विविध ठिकाणी सुरू असलेल्या या हिंसाचारात कित्येक आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले. तसेच, पोलिसांनी बॅरिकेट्स म्हणून वापरलेल्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लाल किल्ला या ठिकाणी झालेल्या हिंसाचारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनी झालेली हिंसा दुर्दैवी आणि देशाला काळीमा फासणारी घटना असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, वास्तविक देश शेतकर्‍यांसोबत आहे. शेतकर्‍यांसाठी आज राळेगणसिद्धी परिवाराने ट्रॅक्टर रॅली काढली. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे गैर नाही. मात्र, कोणतेही आंदोलन हे घटनेने दिलेल्या अधिकारात झाले पाहिजे. घटनेमध्ये कोणत्याही हिंसेला थारा नाही. त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेले हिंसात्मक आंदोलन हे मोठे दुर्दैव आहे. देशाला काळिमा असल्याचे अण्णांनी स्पष्टपणे म्हटले आहे. हा देश घटनेच्या आधारावर व लोकशाही माध्यमातून काम करत आहे. यात आंदोलन करणे चुकीचे नाही. मात्र, देशातील प्रत्येक सार्वजनिक मालमत्ता ही जनतेच्या मालकीची आहे. तिचे नुकसान जनतेनेच करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात हिंसा होत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नसल्याचे अण्णा यांनी परखड मत व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, आयुष्यात मी आतापर्यंत 40 आंदोलन केली आहेत. दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर केलेल्या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले. देशभर लाखो लोक रस्त्यावर आले. मात्र, कुठेही साधा एक दगडही कुणी हातामध्ये घेतला नाही. सरकारला माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून माहितीचा अधिकार, लोकपाल असे अनेक कायदे करावे लागले आहेत. हे सर्व आंदोलने मी महात्मा गांधीच्या मार्गावर सत्याग्रहाच्या मार्गाने आणि अहिंसा तत्त्वावर केले आहेत. अहिंसावादात मोठी ताकद आहे. त्यामुळे हिंसेचा मार्ग कोणीही अवलंबू नये. शेतकर्‍यांनी आपल्या मागण्या शांततेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गावर कराव्यात अशी अपेक्षा अण्णांनी व्यक्त केली आहे.

शेतकर्‍यांचा उद्रेक केंद्र सरकारमुळेच - शरद पवार
  दिल्लीत जे घडले त्याचं समर्थन करता येणार नाही. मात्र शेतकर्‍यांनी दोन महिन्यांपासून दाखवलेला संयम लक्षात घेता केंद्रातील सरकारने सामंजस्याने सकारात्मक वाटाघाटी करायला हव्या होत्या, सरकारने घातलेल्या जाचक अटींमुळेच शेतकर्‍यांचा उद्रेक झाला. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबमधील लोकांना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पाहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक मोदी सरकारने करु नये, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. कृषी विधेयके संसद समितीकडे न पाठवता गोंधळात सभागृहात मंजूर करण्यात आली तेव्हाच मला वाटत होते की हे बिघडू शकते.

केंद्र सरकारची आज उच्चस्तरीय बैठक

  काल हिंसाचारानंतर दिल्लीत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिल्लीत निमलष्करी दलांच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज अमित शाह यांनी पुन्हा बैठक बोलावली आहे. या बैठकीत दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव, गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. दिल्लीत सध्या अतिरिक्त 1500 ते 2000 निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आलेत.

No comments:

Post a Comment