नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 नववर्षाचे स्वागत साधेपणाने करा - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन

अहमदनगर  - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांनी नववर्षाचे स्वागत मोठ्या संख्येने घराबाहेर न पडता अत्यंत साधेपणाने आणि घरातच करावे. घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. यासंदर्भात राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सरत्या वर्षाला निरोप द्यावा आणि नववर्षाचे स्वागत करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर, 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात 05 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे  वाजेपर्यंत संचारबंदी लागू आहे. कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी, 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्‍या व आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने शक्‍यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनासह संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment