नगर शहरात हुडहुडी.. आली थंडीची लाट, बाजारपेठेत शुकशुकाट.. शेकोट्या पेटू लागल्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

नगर शहरात हुडहुडी.. आली थंडीची लाट, बाजारपेठेत शुकशुकाट.. शेकोट्या पेटू लागल्या

 नगर शहरात हुडहुडी.. आली थंडीची लाट, बाजारपेठेत शुकशुकाट.. शेकोट्या पेटू लागल्या

गारवा.. नवा नवा.. वार्‍यावर भिर भिर भिर..पारवा नवा नवा!

नगरी दवंडी प्रतिनिधी

अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून वातावरणातून गायब झालेला गारवा आता पुन्हा जाणवू लागला आहे. आज पहाटे किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी शीतलहरींमुळे शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठादेखील लवकर ओस पडत आहेत. डिसेंबर संपायला आला तरी नगरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत नव्हती. त्यातच नोव्हेंबरमध्ये एकदा नगरचे किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. त्यानंतर पुन्हा वाढ होत किमान तापमान सरासरी 20 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर कमाल तामपान थेट 30 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जात होते.परंतु गेल्या काही दिवसांपासून तापमानात किरकोळ घसरण होण्यास सुरवात झाली आहे.
    काल रविवारी किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 27.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. वातावरणातील गारव्यामुळे शहरी, तसेच ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. चौक, बाजारपेठांमध्येही सायंकाळी लवकर शुकशुकाट होताना बघायला मिळतो आहे. राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणीत 5.6अंश सेल्सिअस, निफाडमध्ये यंदाच्या मौसमातील सर्वात कमी 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय तर गोंदिया येथे 7.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
     उत्तर भारतात पुढील दोन दिवसांत थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी आहे.कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वार्‍यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.

No comments:

Post a Comment