वेदांतनगरमधील भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 28, 2020

वेदांतनगरमधील भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी

 वेदांतनगरमधील भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्याची  जय्यत तयारी

शासकीय निर्देशाप्रमाणे उत्सवाची रूपरेषा तयार : दर्शनासाठी आधारकार्ड व मास्क आवश्यक भाविकांसाठी दि.29 व दि.30 डिसेंबर दरम्यान दर्शनाच्या वेळेत वाढ

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः  येथील वेदांतनगरमधील श्रीदत्तक्षेत्रमध्ये भगवान श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शासन व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे दि.29 व दि. 30 डिसेंबर दरम्यान साजरा केल्या जाणार्‍या भगवान श्री दत्तात्रेय जयंती उत्सवाची रूपरेषा आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना आधारकार्ड किंवा वय व पत्ता असलेले शासकीय कागदपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. वय व पत्याची माहिती देणारे कोणतेही कागदपत्र सोबत नसल्यास व मास्क नसल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे श्रीदत्त देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सचिव श्री. संजय क्षीरसागर, विश्वस्त सर्वश्री मोहन शुक्ल, राजन जोशी, देवराज काशीकर, दिनेश पटवर्धन, प्रदिप जोशी, तुषार कर्णिक, पुरूषोत्तम कुलकर्णी आणि व्यवस्थापक श्री.त्र्यंबक वैकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवले आहे. मंगळवार दि.29 डिसेंबर 2020 ला पहाटे 5 वाजता भगवान श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीला 111 लिटर दुधाचा पवमान अभिषेक सोहळा सुरू होईल. सकाळी 8 वाजता भाविकांकडून संकल्पाने पाद्यपुजा करण्यास सुरूवात केली जाईल. सकाळी 11.30 वाजता वेदमंत्रपठणाचा शुभारंभ करण्यात येईल. दुपारी 12 वाजता जन्मोत्सव सोहळा आणि आरती होईल. दुपारी 3 ते 5 या वेळेत सत्संग मंडळातर्फे श्रीदत्तक्षेत्रमधील प.पू.सद् गुरूंच्या अधिष्ठानमध्ये गुरूजींमार्फत संकल्पाने पाद्यपूजा करण्यात येतील. सायंकाळी 6.30 वाजता महाआरती आणि रात्री 7.30 ते 8.30 या वेळेत मंदिरामध्ये पालखी सोहळा संपन्न होईल. नेहमीप्रमाणे श्रीदत्तक्षेत्रमध्ये पालखी सोहळा न होता यावेळी तो मंदिरातच देवस्थानच्या पुजार्‍यांच्या उपस्थितीत होईल. भगवान श्रीदत्तात्रेय जयंती उत्सवानिमित्त दि.29 व दि.30 डिसेंबर 2020 या दोन दिवसामध्ये भाविकांच्या सुलभ दर्शनाकरिता दर्शन वेळेत वाढ करण्यात आली आहे. दर्शनाच्या वेळा अशा - भगवान श्रीदत्तात्रेयांचे दर्शन - सकाळी 7 ते दुपारी 11.30 आणि दुपारी 12.30 ते रात्री 10.30. प.पू.सद् गुरूंचे अधिष्ठान दर्शन - सकाळी 7 ते दुपारी 11.30 आणि दुपारी 12.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. सायंकाळी 6 वाजल्यानंतर प.पू.सद् गुरूंचे अधिष्ठान दर्शन बंद करण्यात येईल. श्रीदत्तात्रेय निवास दर्शन - सकाळी 7 ते दुपारी 11.30,  दुपारी 12.30 ते सायंकाळी 6 आणि संध्याकाळी 8 ते रात्री 9. श्रीमन् नृसिंह सरस्वती तपोवन येथील दर्शन वेळा - सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहेत. दि.29 व दि.30 या दोन दिवसाच्या कालावधीत दर्शनाच्या वेळेत वाढ करण्यात आली असताना या वेळेमध्ये मंदिर परिसर साफसफाई आणि सॅनिटायझर करण्याकरिता काही वेळ दर्शन बंद ठेवण्यात येईल. भाविकांना जन्मोत्सव सोहळ्याचा आनंद मिळवून देण्यासाठी देवस्थानने दि.29 ला दुपारी 11.30 ते 12.30 या वेळेत थेट प्रक्षेपण मोबाईल अ‍ॅप्लिकेशनव्दारे दाखविण्याची खास व्यवस्था केली आहे. भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे व थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक आहे. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील लहान मुले तसेच सर्दी, खोकला, ताप यापैकी काही लक्षणे निदर्शास आलेल्या आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रसादाचे वाटप केले जाणार नाही. हात-पाय धुण्याकरिता स्वयंचलित जलप्रवाहाची सोय केलेली असल्याने कोणीही नळाला हात लावू नये. कोविड महामारीचा धोका व सरकारी निर्बंध विचारात घेऊन भाविकांनी नारळ, पेढे, फुले वा इतर कोणत्याही वस्तू अर्पण करण्यासाठी आणू नयेत,  असे आवाहन देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने केले आहे. ज्या भाविकांना देणगी, इतर सेवा - पूजा करावयाची असेल त्यांनी देवस्थानच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनव्दारे ऑनलाईन पध्दतीनेच बुकींग करावी. दर्शन झाल्यावर आवारात रेंगाळून गर्दी करू नये. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन श्रीदत्त देवस्थान ट्रस्टने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a Comment