कृषी कायदे चांगले किंवा वाईट हा ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, December 21, 2020

कृषी कायदे चांगले किंवा वाईट हा ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना

 वाळकीच्या शेतकरी मेळाव्यात शेतकरी विरोधी नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

कृषी कायदे चांगले किंवा वाईट हा ठरविण्याचा अधिकार शेतकर्‍यांना

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
नगर तालुक्यातील वाळकी येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात शेतकर्यांचे विविध प्रश्न मांडून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा व्यक्त करुन तातडीने शेतकरी विरोधी असलेले नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तर कृषी कायदे चांगले किंवा वाईट हा ठरविण्याचा अधिकार शेतकर्यांना असल्याचे जाहीर करण्यात आले. तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली.  
    शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाळासाहेब सावळेराम बोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, कार्यक्रमाचे आयोजक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, दिनेश गाडगीळ, कैलास कुलकर्णी, प्रतिक गायकवाड, विराज केळुसकर, अर्पित तिवारी, अभिलाष घिगे, एन.डी. कासार आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वाळकी येथील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल ससाणे यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोरोनायोध्दा सन्मान प्रदान करण्यात आला. बाळासाहेब सावळेराम बोठे म्हणाले की, शेतकर्यांना वीज व पाण्याची आवश्यकता भासते. पाऊस चांगला झाल्या असल्याने पाण्याची कमतरता नाही. मात्र वीज पुरेश्याप्रमाणात मिळण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका विशद करुन केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवला. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच शेतकर्यांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकर्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आज शेतकरी न्याय हक्कासाठी भांडत असताना त्यांच्या हिताचे निर्णय होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष मनोज भालसिंग यांनी शेतकर्यांचा मेळावा घेऊन व त्यांच्या आरोग्याप्रती घेतलेली काळजी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
   या मेळाव्यात आनंदऋषी नेत्रालय यांच्या सहकार्याने शेतकर्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबीराला शेतकर्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भालसिंग यांनी केले. आभार मनोज भालसिंग यांनी मानले.

No comments:

Post a Comment