ज्येष्ठांनी घरात सुरक्षितपणे राहून कुटुंबियांसोबतचा आनंद लुटावा-प्रा. गोखले
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ज्येष्ठ नागरिकांनी आजच्या कोविड महामारीला न घाबरता स्वतःची विशेष काळजी घेतली तर भितीचे कारणच रहात नाही. घरात सुरक्षितपणे राहून कुटूंबियांसोबतचा आनंद मनसोक्तपणे लुटता येतो. जीवनाचा आनंद घेणे व सतत आनंदी रहाणे आपल्याच हाती आहे, असा मौलिक संदेश हिंद सेवा मंडळाचे आजीव सक्रीय सभासद आणि पेमराज सारडा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त ग्रंथपाल प्रा.शरद गोखले यांनी आपल्या स्वानुभवातून दिला.
प्रा. शरद गोखले यांनी वयाची 85 वर्षे पूर्ण करून 86 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हितचिंतकांशी हितगुज करताना ते बोलत होते.
प्रा.शरद गोखले म्हणाले, शुध्द शाकाहार, नियमित व्यायाम आणि निर्व्यसनी जीवनशैली हीच माझ्या जीवन वाटचालीची गुरूकिल्ली आहे. जागतिक महामारी कोरोनाच्या परिस्धितीतही शिस्तबध्द व नियमित जीवनशैलीतून वयाच्या 86 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करता आले, याबद्दल धन्यता वाटते.
श्रीनिधी प्रकाशनचे प्रकाशक-पत्रकार मिलिंद चवंडके यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करताना प्रा. गोखले सरांनी ग्रंथपाल म्हणून सेवा करताना माझ्यासारख्या काम करून शिकणारे विद्यार्थ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहाण्याची भूमिका निभावली, याबद्दल माजी विद्यार्थी म्हणून आम्ही ऋणी आहोत, असे सांगितले.
हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, अशोक उपाध्ये, सुप्रभात ग्रुपचे अविनाश जोशी, सतीश सुपेकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रा. शरद गोखले हे नगरमधील सरगमप्रेमी मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य असून भोर येथील भोर एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार व आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेचे संस्थापक आहेत. सुप्रभात ग्रुपचेही सभासद आहेत.
भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ.बिरासदार, आधारवडचे पद्माकर नांदूरकर, सरगमप्रेमी मित्र मंडळाचे धनेश बोगावत व महेश कुलकर्णी यांनीही गोखले सरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment