लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर नाट्यगृहाचा पडदा उघडला... ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर नाट्यगृहाचा पडदा उघडला... !

 लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर नाट्यगृहाचा पडदा उघडला... !


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर नाट्यगृहाचा पडदा उघडला आणि पहिला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा मान संस्कार भारती अहमदनगर समितीला मिळाला. 

संस्कार भारती, अहमदनगर समिती आणि माऊली संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी उत्पत्ति एकादशीच्या निमित्ताने माऊली सभागृहात ’अभंग रंग’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास दहा महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संस्कार भारती चे कलाकार हे प्रेक्षकांसमोर आपली कलासेवा सादर करणार होते त्यामुळे प्रत्येक कलाकार हा अतिशय उत्साही व आनंदी दिसत होता. आणि कलारसिक प्रेक्षक देखील खुप दिवसांनी समोरासमोर कलास्वाद घेण्यास उत्सुक दिसत होते.

संस्कार भारतीच्या भू-अलंकरण विधेच्यावतीने विधा उपप्रमुख सौ गितांजली कुरापाटी, सत्यम लुणिया आणि सौ. गार्गी मुळे यांनी प्रवेशद्वारी  रेखाटलेली भव्य सुबक रांगोळी येणार्‍या सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेत होती.

सभागृह प्रेक्षकांनी भरले आणि अखेर ती वेळ आली स्वागतम् सुस्वागतम् हा ध्वनी आतूरलेल्या कानावर पडला आणि अखेर टाळ्यांच्या गजरात पडदा उघडला.पडदा उघडताच संस्कार भारतीच्या ध्येय गीताने संपूर्ण माऊली सभागृहात आनंदाने नवचैतन्याने भारावून गेले.

ध्येय गीतानंतर कोणतीही औपचारिकता न ठेवत संस्कार भारतीच्या नृत्य कला विधा प्रमुख सौ वर्षा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विधेच्या समन्वयक कु. वैष्णवी डेरे आणि कु मेघना कुलकर्णी यांनी गणेश वंदना आपल्या सुरेख भरतनाट्याद्वारे सादरकेली.

याप्रसंगी संस्कार भारती, अहमदनगर समितीचे अध्यक्ष दीपक शर्मा यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला. लॉकडाउनच्या कालखंडात आम्ही दोन-तीन ऑनलाईन कार्यक्रम घेतले पण त्यात जिवंतपणा नव्हता आज रसिक प्रेक्षकांसमोर कला सादर करण्यास आमचा प्रत्येक कलाकार हा आसुसलेला आहे.आजच्या कार्यक्रमात संस्कार भारतीच्या नृत्य, भूअलंकरण, साहित्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत आदी विधां सहभागी आहेत हे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक कलाकाराला रसिकांची दाद हवी असते. रसिकांच्या टाळ्या ही त्याची ऊर्जा असते. त्यामुळे आज खूप समाधान वाटते. लवकरच सर्व कलाविधांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे ते म्हणाले.

माऊली संकुलचे सचिव श्री रावसाहेब निमसे म्हणाले की संस्कार भारती आणि लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर पडदा उघडला! आणि पहिला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा मान संस्कार भारती अहमदनगर समितीला मिळाला. 

आपले मनोगत व्यक्त करताना आचार्या विश्रुतिजी यांनी संस्कार भारतीच्या ध्येय गीताचा अर्थ सांगत आपल्या जीवनातील संस्कारांचे महत्व विषद केले. संस्कार विरहित  शिक्षणाने राष्ट्राचे कल्याण अशक्य आहे. असे सांगून राष्ट्र सुसंस्कारित व्हावे यासाठी तरुण पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी  लवकरच अहमदनगर येथे गुरुकुल स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या या कार्यक्रमास आचार्या विश्रुतिजी आणि त्यांच्या सहकारी यांची उपस्थिती लाभली. त्यांनी केलेल्या मंत्रघोषाने उत्साही वातावरण पवित्र आणि प्रसन्न झाले.

श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्यांनी तसेच योगगुरु स्वामी रामदेव महाराज आणि आचार्य बालकृष्णजी आदी थोर प्रभुतींकडून आचार्या विश्रुतिजी यांना गौरविण्यात आले आहे. 

 कार्यक्रमाचे सुरूवातीला आचार्या कु विश्रुतिजी, संस्कार भारती अहमदनगर समिती चे अध्यक्ष अ‍ॅड दीपक शर्मा सचिव विलास बडवे , माऊली संकुल चे श्री तुकाराम सुतार, सचिव रावसाहेब निमसे, खजिनदार दिनकर घोडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री नटराज पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमात संस्कार भारतीच्या केंद्रीय व प्रांतातील दिवंगत मान्यवरांना, तसेच अहमदनगर समितीचे कार्यकारीणी सदस्य व श्रेष्ठ रंगकर्मी कै बाळकृष्ण ओतारी, चित्रकला विधा समन्वयक कै. राजेंद्र श्रीमल. माऊली संकुल चे कै. एन. डी. कर्डिले तसेच कै व्ही. डी. वाघमारे आदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

संस्कार भारती अहमदनगर समिती चे सचिव विलास बडवे यांनी आचार्या विश्रुतिजी, उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक, माऊली संकुल चे पदाधिकारी, शांती ऑडीओचे चे श्री राजु ढोरे यांचे आभार मानले. या शानदार उद् घाटन सोहळ्याचे सुत्रसंचलन कु. अमृता देशमुख यांनी अतिशय सुरेख केले.

यानंतर ’अभंग रंग’ या कार्यक्रमात संगीत विधेने विधा प्रमुख श्री प्रसाद सुवर्णपाठकी उपप्रमुख श्री श्रीराम तांबोळी यांचे मार्गदर्शनाखाली श्री ओंकार देऊळगावकर, श्री महेश खोपटीकर, कु. श्रेया कुलकर्णी, कु. अनुजा कुलकर्णी व श्री संकेत सुवर्णपाठकी आदींनी अभंगांचे सुश्राव्य गायन केले. त्यांनी गायलेल्या बहुतेक अभंगांना रसिकांनी ’वन्समोअर’ दिला त्यांना तबल्यावर श्री प्रसाद सुवर्णपाठकी आणि सार्थक डावरे यांनी तर संवादिनी वर श्री संकेत सुवर्णपाठकी तालवाद्यावर श्री अच्युत घबाडे यांनी सुरेख साथ दिली. तर गायकांनी गायलेल्या अभंगांविषयी विवेचन करीत कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत निवेदन श्री आनंद कुलकर्णी यांनी केले. 

मंचावर गायन सुरू असतानाच एकीकडे चित्रकला विधा प्रमुख अशोक डोळसे यांनी श्री विठ्ठलाचे सुंदर चित्र रेखाटले. तर शिल्पकला विधा प्रमुख विकास कांबळे यांनी विठ्ठलाचे अप्रतिम शिल्प साकारले. साहित्य विधेमार्फत पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला होता. या कार्यक्रमासंदर्भी आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते. 

याप्रसंगी संस्कार भारती, अहमदनगर समितीचे सहसंघटनमंत्री महेश कुलकर्णी, सहसचिव गिरीश वाळुंजकर, सह कोषप्रमुख वसुदेव गिरगस, साहित्य विधा प्रमुख श्री शिरीष जोशी, श्रीराम तांबोळी, अरविंद मुनगेल,शेखर वाघ, दिलीप पंडित, योगेश पंडित,आनंद कुलकर्णी सुरेंद्र सोनवणे, नंदकुमार देशपांडे सौ. दीपाली माळी, सौ सुनिता शर्मा, सौ. ऊर्मिला बडवे, सौ. स्नेहल झांबरे सौ अपर्णा बालटे सौ शैलजा वाळुंजकर, समृद्धी बापट, जान्हवी खिस्ती, जान्हवी लांडगे माऊली संकुल चे पदाधिकारी तसेच नगर शहरातील नृत्य, गायन, वादन, नाट्य अशा विविध क्षेत्रातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment