अनाधिकृत बैलगाडी जुगाडावर कारवाई करण्यासाठी अ. भा. छावाचे घेराव आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, December 17, 2020

अनाधिकृत बैलगाडी जुगाडावर कारवाई करण्यासाठी अ. भा. छावाचे घेराव आंदोलन

 अनाधिकृत बैलगाडी जुगाडावर कारवाई करण्यासाठी अ. भा. छावाचे घेराव आंदोलन

कारवाई करण्याचे आरटीओचे लेखी आश्वासन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात अनाधिकृत ट्रॅक्टरला जोडलेली बैलगाडी जुगाडामुळे अनेक अपघात वाढले असून संबंधित ट्रॅक्टरचालकावर व कारखानदारांवर कारवाई करण्यासह अनेक मागण्यांसाठी आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात आले. उपप्रादेशिक अधिकार्‍यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डगळे यांनी निवेदन स्वीकारून कारवाई करण्याचे ठोस आश्वासन लेखी स्वरूपात दिले. तोपर्यंत अखिलभारतीय छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी आर टी ओ कार्यालयाच्या पायर्‍या वर घेरवो घालून ठाण मांडून होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संघटनेनेत वेळो वेळी दिलेल्या निवेदनाची आपण दखल न घेतल्याने तसेच आपण 14/12/2020 रोजी आपल्या विभागाअंतर्गत असणार्‍या साखर कारखान्यांना तुटपुंज्या कारवाईचे पत्र काढून या विषयास फाटा देण्याचा जो प्रयत्न चालविला आहे. तो संघटनेस मान्य नाही. आपण केलेली कारवाई ही फक्त कागदोपत्री दिसते. आम्ही आपल्याला मागील हंगामात फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भात पत्र दिले होते. त्या अनुषंगाने कारखाने सुरू होण्याच्या दरम्यानच्या काळात आपण कारखान्यांना पत्र देणे अपेक्षित होते. परंतू ट्रॅक्टरला जोडलेले अनाधिकृत बैलगाडी जुगाड आपल्या
परवानगीशिवाय चालत असून पूर्णपणे बेकायदेशीर असताना सुद्धा प्रत्यक्ष ट्रॅक्टर मालकावर आणि त्यांचा करार करून घेणार्‍या कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी आपण तुटपुंजे पत्र काढून कागदी घोडे नाचविण्याचा सरकारी कार्यक्रम राबविला आहे. त्याविरोधात आम्ही आज आपल्याला घेरावो आंदोलन करीत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
अनाधिकृत ट्रॅक्टरला जोडलेली बैलगाडी जुगाड ट्रॅक्टरचालकावर व कारखानदारांवर कारवाई करावी. या बैलगाडी जुगाडामुळे अपघात झाल्यास त्याचा कोणताही विमा लाभार्थ्यांना मिळत नाही. त्याची सर्व जबाबदारी ट्रॅक्टरमालक व कारखानदार यांची असेल असे पत्र काढावे. सर्व ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रक बैलगाडी अन्य वाहनांना रेडियम लावावे. रात्रीच्यावेळी योग्य प्रकाशझोत असलेल्या वाहनांनाच परवानगी द्यावी. डबल ट्रेलर असल्यास मागील ट्रेलरच्या खाली प्रकाशझोत असावा. प्रत्येक महिन्याला सर्व ऊस वाहतूक कणार्‍या वाहनांची आरटीओ तपासणी बंधनकारक करावी. यासर्व मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दुधाळ व मेहेर यांनी आंदोलकांना आरटीओ कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर निनादून सोडला. अखेर लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात जिल्हाप्रमुख नितीन पटारे,जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री देवेंद्र लांबे, शरद बोंबले,अमोल वाळुंज,रमेश म्हसे,प्रवीण देवकर,निलेश बानकर, मनोज होन,लक्ष्मण कसबे,विजय बडाख,प्रविण कांबळे ,प्रदिप पटारे,अक्षय बोरुडे,राहुल तारक,अमोल रोकडे,ऋषिकेश राऊत,महेश राऊत,अजिंक्य राऊत,ओंकार सोनुले,अनिल तळोले,सुहास निर्मळ,बाबासाहेब डांगे,दिपक पठाडे,सुरेश कुंजीर,देवेंद्र वीरकर,गोरख शेजुळ,सुभाष कापसे,विजय तेलोरे,जगन्नाथ कापसे,राहुल चिंधे आदींनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment