सोनिया गांधींचा लेटर बॉब.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 19, 2020

सोनिया गांधींचा लेटर बॉब..

 सोनिया गांधींचा लेटर बॉब..

समान कार्यक्रम राबविण्याची सूचना; राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांची सारवासारव


महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या दोन पानी पत्राद्वारे त्यांनी आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती ठाकरे सरकारला केली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर जनकल्याणकारी योजना राबवण्याचा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला होता. भविष्यात आदिवासी, दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची शाश्वती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

मुंबई: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याने महाविकास आघाडीत अलबेल नसल्याची चर्चा सुरू झालेली असतानाच शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र त्यावर सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. सोनिया गांधींचं लेटर म्हणजे लेटरबाँब नाही, हा संवाद आहे, अशी सारवासारव दोन्ही काँग्रेसने केली आहे.
सोनिया गांधी यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसने त्यावर आज प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद आहे. हा लेटरबाँब नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आधारीत आहे. सामान्य माणूस हा आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. गरीब, मागासवर्गावर सरकारने अधिक लक्ष द्यावं ही आमची भूमिका आहे. त्यामुळे सरकारवर नाराजीचा प्रश्नच येत नाही, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारने मागासवर्गावर आणि गरीबांवर अधिक लक्ष द्यावं यासाठीच हे पत्र लिखित स्वरुपात पाठवण्यात आलं आहे. त्यात कोणतीही नाराजी नाही, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील मागासवर्ग, गरीब आणि अल्पसंख्याकांना संरक्षण देणं ही काँग्रेसची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे. त्यामुळे सोनिया गांधी या मुख्यमंत्र्यांशी बोलल्या असतील तर त्यात काही चूक आहे, असं वाटत नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करतात. त्यांना काही सूचनाही करत असतात. सोनिया गांधींना मुख्यमंत्र्यांशी वारंवार चर्चा करता येत नसेल, त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं असेल, असं भुजबळ म्हणाले.
सोनिया गांधी फोन करून विविध मुद्द्यांवर चर्चा करत असतात हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी या चर्चांचा एक भाग म्हणूनच पत्र लिहिलं असेल. हा दबावतंत्राचा भाग आहे, असं वाटत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. कोरोना संकटामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. सरकारच्या अडचणीही वाडल्या आहेत. अशा परिस्थितीतही किमान समान कार्यक्रम राबवला जावा, अशी भूमिका मांडणं काही गैर नाही, असंही ते म्हणाले.
सोनिया गांधी यांचं पत्रं हा दबाव तंत्राचा भाग नाही. सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याविषयीचे काही मुद्दे त्यांनी पत्राद्वारे मांडले आहेत. याचा अर्थ हा दबावतंत्राचा भाग आहे, असं समजण्याचं कारण नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. किमान समान कार्यक्रमात दलित आणि शोषितांच्या विकासाची हमी देण्यात आली आहे. त्यावर आघाडी सरकार काम करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रम कसा लागू होईल, याकडे लक्ष देत आहेत, असंही ते म्हणाले.\

“राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील असल्याचं मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्याची पोचपावतीच दिली आहे, असं सांगतानाच आता तरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठीची लाचारी झुगारून आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, - आमदार गोपीचंद पडळकर


No comments:

Post a Comment