आरतीने बदलला सारा समाज... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

आरतीने बदलला सारा समाज...

 आरतीने बदलला सारा समाज...


आष्टी -
 आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र वाहिरा येथे संत शेख महंमद महाराज समाधी मंदिरातील आरतीने सारा समाज बदलला असल्याची भावना पंचकृषीत निर्माण झाली आहे. संत शेख  महंमद महाराजांच्या वंशजांनी लिहिलेली आरती व अरातीविषयी ची परंपरा  या विषावर प्राथमिक शिक्षक श्री. किसान आटोळे यांनी लिहिलेला हा थॊडक्यात लेख.

कोरोना आला अन सारं जनजीवन ढवळून निघालं. प्रत्येकाने याकाळात चढउतार अनुभवले. सुव्यवस्थित चाललेल्या जीवनात विस्कळीतपणा आला. कोरोनामुळे काही उद्ध्वस्त झाले तर काहींनी कोरोना काळात संधी शोधली. शहरात रोजीरोटीसाठी गेलेला तरुण गावात आला. खूप वर्षांनी गावोचीगावे गजबजून गेली. मित्र नातेवाईक यांच्या गाठीभेटी झाल्या. भरभरून एकमेकांशी बोलले. मनातील भाव भावना, सुख-दुःखाची देवाणघेवाण झाली. याला आमचं वाहिरा गाव अपवाद नव्हते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात शेतात, गावाबाहेर पार्ट्या, पत्त्या, धिंगाणा सुरू होता. पोलिसांना कळू नये म्हणून लपूनछपून हे उद्योग सुरू होते. पोलिसांची गाडी आली अशी अफवा पसरली तरी धावाधाव होत होती. सगळे मित्रमंडळी जमून आनंद घेत होती. पोलीस पकडतील ही मनात भीती होती. एकत्र जमली की गप्पा गोष्टीत वेळ जात होता.. कोरोना कसा आला? कुठून आला? गल्ली ते दिल्ली थेट चीन- अमेरिका इटलीतील परिस्थितीचा आढावा घेत होती. कोरोनाने उग्ररूप धारण केले होते. देशातील कोरणाग्रस्तांची संख्या लाखात चालली होती. परंतु माणूस किती दिवस गप्प राहणार?किती दिवस घाबरणार? पूर्वी सारखी भीती आता राहिली नव्हती. गावात सगळे एकत्र असल्याने वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची.

अशीच एका दिवशी ह.भ.प. सिद्धीनाथ मेटे महाराज, मी स्वतः श्री. किसन आटोळे, रूपचंद झांजे चेअरमन, उपसरपंच सतीश आटोळे इतर मित्रमंडळी शेख महंमद महाराजांच्या दरबारात बसलो होतो. संत शेख महंमद महाराजांचे चरित्र लिहिलेल्या पाट्या खराब झाल्या होत्या. त्या आपण डिजिटल करू असा आम्ही विचार चर्चेअंती आमच्या मनात आला. परंतु यासाठी आर्थिक तजवीज करणे गरजेचे होते. याचा विचार करुन आम्ही बसल्या ठिकाणीच शेख महंमद महाराज चरित्र पाटी तयार करण्यासाठी जो कोणी बोर्डसाठी देणगी देईल त्याचे पाटीवर सौजन्य म्हणून नाव टाकले जाईल असा मॅसेज गावातील व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला. चरित्र पाट्यांसाठी पंधरा ते वीस हजार लागणार होते. परंतु शेख महंमद महाराजांवर असलेली प्रचंड श्रद्धा , सर्वांना काहीतरी करण्याची असलेली इच्छा, गावाविषयी असलेले प्रेम ,तळमळ यामुळे सर्व स्तरातून तब्बल सव्वालक्ष रुपये जमा झाले. मग आम्ही चरित्रबोर्ड तर लावले परंतु शेख महंमद महाराज हस्त लिखित अभंग व त्याचा भावार्थ असणारे 150 अभंगबोर्ड मंदिरात लावले. आज शेकडो भाविक दर्शनास येतात ते अभंगबोर्ड वाचून धन्य धन्य होतात.
याच काळात आम्ही तरुणांसाठी व्यसनमुक्तीचा उपक्रम हाती घेतला. यात वीस ते पंचवीस तरुणांनी दारु ,मावा, तंबाखूचे व्यसन सोडले. या कार्यात सर्व तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला. चांगल्या कार्यासाठी गाव उभे राहते, हे दिसून आले. हे चालू असतानाच संत शेख महंमद महाराजांची महती सर्व स्तरापर्यंत पोहोचवावी यासाठी तरुणांनी आरती सुरू करण्याचे नियोजन केले. आज दररोज एक कुटुंब आरतीचे मानकरी आहे. आरती सुरू झाल्यामुळे निस्तेज असणारे गाव जागृत झाले. दररोज सकाळी सात वाजता आरती होते. शेकडो भाविक आरतीला हजर असतात. सकाळी महाप्रसाद होतो. पंचक्रोशीतील गावात चैतन्य निर्माण झाले. उशिरा उठणारी माणसे दररोज पहाटे चार पाच वाजता उठू लागली. संत शेख महंमद महाराजांच्या दर्शनाला येऊ लागली. सकाळी लवकर उठण्याची सवय प्रत्येकाला लागली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्तरातील माणसं येऊ लागली. सकाळी सकाळी चालण्याची सवय लागली. यामुळे व्यायाम सुरू झाला. प्रत्येकाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. शरीर आणि मन तंदुरुस्तीचे साधन आरती ठरू लागली आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी संत शेख महंमद महाराजांनी हिंदू मुस्लिम यातील द्वैत नाहीसे करण्याचे महान कार्य केले. ती ऊर्जा, ते विचार आजही तितकेच प्रभावी आहेत हेच यातून दिसून येते. संत शेख महंमद महाराज हे संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास, जयरामस्वामी, गोदड महाराज, प्रल्हाद महाराज यांचे समकालीन संत. त्याकाळच्या संतमंडळींनी शेख महंमद महाराजांना गुरुस्थानी मानले होते. संत तुकाराम महाराजांना कीर्तनास उभे केले. जयराम स्वामींना साक्षात्कार घडविला. अनेक आख्यायिका, प्रसंग, घटना या गोष्टीला साक्षी आहेत. श्री रामदास स्वामी यांनी शेख महंमद महाराजांची आरती लिहीली आहे ती आरती अशी,
जय जय आरती जय महंमद शेका । तुझ ब्रह्मादि वर्णिती तुझं अनंत गज विवेका ॥ध्रु॥
आरतीचे शेवटचे कडवे असे आहे,
देह जरी ओवाळू कसून पापाचे। जीव शिव पाळा नरेंद्र देह तुमचे॥ भावभक्ती जनी पोषणे संताचे। रामी रामदास चरणरज रज महंमदाचे ॥4॥
ही संत शेख महंमद महाराजांची पहिली आरती मानली जाते. यानंतर शेख महंमद महाराजांचे वंशज त्यांचा मुलगा शिष्य अजम, दावलजी आणि हकीम यांनीही संत शेख महंमद महाराजांची आरती लिहिलेली आहे. अजम यांची आरती,
सेविन संत मुनिजन अखंड अनुभव संतोषे । शैवी वैष्णव दीक्षा या स्थळ होती अस्पशे ॥
शेवट वेदान्ताचा निशब्द विगळीत षटकोशे। सेजे उन्मनी येऊनी जेथे जगदाभास निरसे ॥1॥
शेख महंमद महाराजांचा मुलगा दावलजी यांनीसुद्धा आरती लिहिलेली आहे.
चौदा भुवने पहाता अवघा स्वयम्भाकार । इच्छेपासुनी तो जाला आकार॥
पांचा तत्वांची करून आरती । ज्ञानदीप लाऊनी घेतली हाती ॥
भावे ओवाळीले आम्ही श्रीपती । शेख महंमद गुरु माझा तो सती ॥
घेऊनी बैसले मजला पंगती । सद्गुरु प्रसादे अविनाश आरती ॥
हकीम तर संत शेख महंमद महाराजांच्या उन्मनी अवस्थेची आरती करतात.
आरती आरती उन्मनी अवस्था जेथे । उन्मये अविलंबे प्रकाश स्वयंभू हो तेथे ॥ध्रु॥
उर्ध्वदृष्टी बुडूनी सृष्टी तन्मयता अंतरी । ज्ञानामृत वर्षेती धारा पूर्ण विश्रांती ॥1॥
त्रिवेणी संगमी स्थान नित्य दर्शन । पूज्य पूजक पहाता भावे जाला आपण ॥2॥
तुर्येचे जे अंतकरणी हो महदांद । हकीम महंमद आरती ऐसी भाविका छंद ॥3॥
अशा अनेक आरत्या भक्तांनी लिहिलेल्या आहेत. आरती म्हणजे आपल्या गुरूची, देवाची स्तुती करणे. मनोभावे भजन पूजन करणे. शेख महंमद महाराजांनी सुद्धा अनेक आरत्या लिहिलेल्या आहेत. ते आपण नंतर पाहणारच आहोत. परंतु शेख महंमद महाराजांवर असलेली निस्सीम भक्ती, त्यांच्यावर
असलेली निस्सीम श्रद्धा यावरून दिसून येते. महाराजांची पारंपारिक आरती प्रसिद्ध आहे,
जय देव जय देव शेख महंमदा । आरती ओवाळीतो तुजवरी अहमदा ॥ध्रु॥
तसेच देसाई कृत योगसंग्राम ग्रंथातील आरती अशी आहे,
जयदेव जयदेव जय महंमद राया । असशी अवतार कबीराचा या ॥
तसेच संत शेख महंमद महाराज यांची जन्मभूमी असलेल्या वाहीरा गावी दररोज सकाळी सात वाजता
भगवान महाराज लिखित आरती,
आरती शेख महंमदाची । ओवाळा सज्जन संताची ॥ध्रु॥ ही आरती नित्यनेमाने घेतली जाते. पंचक्रोशीतील भाविक भक्त येतात. आरती म्हणतात व दररोज ऊर्जा घेऊन जातात. तसेच परिसरातील फुलाई माता उद्यान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संत शेख महंमद महाराज सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे. त्यांचे योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंक प्रबोध, अभंग, हिंदुस्तानी कविता, भारुडे असे खूप साहित्य उपलब्ध आहे. यातून त्यांचे विचार ,कार्य किती महान होते हे लक्षात येते. समाजाला योग, भक्ती, ज्ञानाचा मार्ग दाविला. जातिभेद धर्मभेद न करता प्रबोधन केले. समाजातील अनिष्ट चालीरीतीवर प्रखर हल्ले केले. आज समाजात, देशात धर्माधर्मात वाद होत आहेत, एकमेकांचा द्वेष केला जातो. धर्मातील ठेकेदार हा द्वेष पसरवितात अशा लोकांनी शेख महंमद महाराजांचे विचार जाणून घ्यावेत. त्यांचे साहित्य त्यातील विचार नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. देश घडविण्यासाठी नक्कीच त्या विचारांची गरज आहे.

No comments:

Post a Comment