राहुरी तालुक्यात शनिवारपर्यंत केवळ 44 टक्के शिक्षकांच्या कोरोना चाचण्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, November 23, 2020

राहुरी तालुक्यात शनिवारपर्यंत केवळ 44 टक्के शिक्षकांच्या कोरोना चाचण्या

 राहुरी तालुक्यात शनिवारपर्यंत केवळ 44 टक्के शिक्षकांच्या कोरोना चाचण्या


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्यात शनिवारपर्यंत केवळ 44 टक्के शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होऊ शकल्या ! दरम्यान तपासणी किट्स कमी असल्याने आता रोज केवळ 50 च जणांच्या चाचण्या होणार आहेत ,त्यामुळे आरोग्य विभाग आणि शिक्षकांची ही नवी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र राहूरीत दिसत आहे .
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार दि. 23 नोव्हेंबरपासून इ. 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्या वर्गांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोव्हिड - 19 संबंधित अत्यंत विश्वासार्ह मानली जाणारी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागांना आदेश देऊन ही चाचणी प्रक्रिया सुरू केली. परंतु जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेऊन शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन केंद्रशासन प्रमाणित प्रयोग शाळांमधून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या चाचण्या घ्याव्यात, असे आवाहन केले होते .
याशिवाय राहुरी तालुक्यात एकूण 978 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत . प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाने राहुरी कृषी विद्यापीठ , वांबोरी आणि ताहाराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दि 17 पासून या चाचण्यांना सुरुवात केली . आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 978 पैकी 435 जणांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत , पैकी 258 जणांचे अहवाल प्राप्त झाले . त्यात केवळ दोन शिक्षक पॉझिटिव आढळून आल्याचे सांगण्यात आले . तर इतर 177 जणांचा अहवाल येणे बाकी आहे .
दरम्यान तपासणी किट्स संपल्याने व जिल्हा कडून दिवसाला पुरेसे किट्स उपलब्ध न झाल्याने अनेक शिक्षकांना चाचणी न करता माघारी परतावे लागले . आता जिल्ह्याकडून राहुरीला केवळ पन्नास किट उपलब्ध होणार असल्याने आता रोज 50 जणांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
वांबोरी येथे मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या चाचण्या झाल्याने अजूनही 978 पैकी 543 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कोरोना चाचण्या होणे बाकी आहे . उद्यापासून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू होणार काय असाही प्रश्न उभा राहिला आहे . राहुरी तालुक्यात डॉ . दादासाहेब तनपुरे शिक्षण संस्था , शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ , रयत शिक्षण संस्था , प्रवरा शिक्षण संस्था , जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था या व अन्य संस्थांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मोठे जाळे पसरलेले आहे . काही शिक्षण संस्थांनी स्वतः पुढे होऊन आपापल्या शिक्षकांच्या चाचण्या करून घेतल्या आहेत आता उद्यापासून विद्यालय सुरू होणार का ? पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळणार ? याकडे राहुरी तालुक्यातील क्षेत्राचे व सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here