व्यक्ती, समाज आणि राष्ट्र उभारणीत ग्रंथांचे योगदान महत्त्वाचे ः डॉ. देसाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, October 17, 2020

व्यक्ती, समाज आणि राष्ट्र उभारणीत ग्रंथांचे योगदान महत्त्वाचे ः डॉ. देसाई

 व्यक्ती, समाज आणि राष्ट्र उभारणीत ग्रंथांचे योगदान महत्त्वाचे ः डॉ. देसाई


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः आपण किती वाचतो यापेक्षा कशापद्धतीने वाचतो, काय वाचतो याला महत्त्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ प्रभाकर देसाई यांनी केले.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्तपणे ऑनलाइन वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर होते.
डॉ. प्रभाकर देसाई पुढे म्हणाले,  वाचकांच्या भावनेला हात घालणारी पुस्तक ही लोकप्रिय पुस्तके असतात. वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रारंभाच्या काळात लोकप्रिय पुस्तके वाचायला हरकत नाही. परंतु खर्‍या अर्थाने वाचकांच्या विचारांना हात घालणारी, विचारांना चालना देणारी पुस्तके वाचण्यावर भर दिला पाहिजे. जर आपण चांगले पुस्तके वाचू शकलो नाही तर कायम दुसर्‍यावर विसंबून राहण्याची वृत्ती बळावत जाते. समाजात घडणार्‍या विविध घटनांचा नेमका अर्थ लावण्याची क्षमता वाचनामुळे प्राप्त होते. सध्याच्या परिस्थितीत इतरांचे विचार ऐकण्यापेक्षा वाचनावर भर देण्याची आवश्यकता आहे. कारण नुसते ऐकले की विचारांना चालना ही मिळत नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, विद्यार्थ्यांनी सर्वांगीण वाचन करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच विविध ललित साहित्य, वैचारिक साहित्य व इतर विषयातील अनेक ग्रंथांचे वाचन करून विचारांची मशागत करावी.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, डॉ. दिपक सोनटक्के, डॉ. विजयकुमार राऊत, प्रा. विरेंद्र धनशेट्टी, प्रा. अशोक मोरे, डॉ. तुकाराम थोपटे, डॉ. भाऊसाहेब शेळके, प्रा. मंगेश चितळकर आदी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख  डॉ. हरेश शेळके, यांनी केले तर आभार प्रा. नंदकुमार उदार यांनी मानले तर सूत्रसंचालन  डॉ. माया लहारे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here