कोरोनाच्या सावटातही घटस्थापनेसाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

कोरोनाच्या सावटातही घटस्थापनेसाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह

 कोरोनाच्या सावटातही घटस्थापनेसाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह

मंदिरे सजली.. आरती सुरू


अहमदनगर ः नवरात्रोत्सवास  आज पासून प्रारंभ झाला आहे. घराघरात मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना होणार आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. यासाठी काल घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. कोरोनामुळे केडगाव व एमआयडीसीमधील रेणुका माता मंदिर, बुर्‍हाणनगर मधील तुळजा माता मंदिर यात्राही रद्द करण्यात आली आहे. केवळ पुजार्‍यांच्या हस्ते सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात आली आहे. अशाच प्रकारे रेणुकामाता मंदिरातही देवीची पुजार्‍यांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा करीत घटस्थापना करण्यात आली. शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद असतील. मात्र, नियमित सकाळ व सायंकाळी आरती केली जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली देवीची मंदिरे आदिमातेच्या नवरात्री उत्सवा निमित्ताने सजली आहेत. आज परंपरागत पूजा-अर्चना घटस्थापना करण्यात आली. मात्र, देवी भक्तांना मातेच्या दर्शनाचा लाभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिळणार नाही. पण भक्तगण बाहेरुन मुखदर्शन घेत माते कोरोनाचं संकट कायमस्वरुपी जाउ दे अशी प्रार्थना करत आहेत.
नगरकरांचे श्रद्धास्थान असणार्‍या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने विधीवत पुजा करून घटस्थापना करण्यात आली . मंदिराबाहेर यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन तसेच मुखदर्शनाची सुविधा करण्यात येत आहे. केडगावच्या रेणुकामंदिरात आज सकाळी 6 वाजता अभिषेक करण्यात आला . मंदिर परिसरातील मंगळाई देवी, भवानी गुरव यांच्या पादुका , भैरवनाथ मंदिर पुजन, परशुराम पुजन झाल्यानंतर केडगावमधील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांच्या हस्ते विधीवत पुजा होऊन सपत्निक घटस्थापना करण्यात आली. यावेळी महाआरती करण्यात आली. देविला पारंपारिक आभुषणे परिधान करण्यात आली होती. मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुजारी राजु गुरव, राम गुरव, शंकर कदम, शेखर गुरव, सुनील गुरव आदिंनी पौराहित्य केले .कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणुन नवरात्र उत्सव काळात मंदिराचे भाविकांसाठी बंद राहणार असुन मुखदर्शन व ऑनलाईनदर्शनाची सोय मंदिराच्या बाहेरून करण्यात आली आहे. यंदा मंदिर परिसरात यात्रा भरणार नसल्याने एकही स्टॉल लागला नाही मंदिर परिसरात भाविकांना मज्जाव असला तरी मंदिरात दरवर्षि प्रमाणे घटस्थापना, दोन वेळा आरती, ललित पंचमीला कुंकुम आर्चन, सातव्या माळेला फुलोराचा नैवेद्य, नवमीला होमहवण, दसर्‍याला शस्त्र पुजन आदि धार्मिक विधी नियमाप्रमाणे होणार आहेत.
शहरातील चितळे रोड, गंज बाजार, माळीवाडा आयुर्वेद कॉलेज रोड येथील रस्त्यावर मातीचे घट, सप्तकडधान्य, नागवेलची पाने, हारतुरे, फुले, अगरबत्ती, गुगुळ, काळी माती, गोवर्‍या यांची खरेदी महिलांनी केली. काल अमावस्या असल्याने अनेकजनांनी आज खरेदी केली. कोरोनामुळे घटस्थापनेच्या साहित्यात कुठलीच वाढ झालेली नाही, असे अनेक विक्रेत्यांनी सांगितले.यंदा सरकारने चार फुटांपर्यंत देवीची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मूर्तिकारांनी एक ते चार फुटांपर्यंत देवीचे विविध रूप असलेली मूर्ती तयार करून विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र, शुक्रवारी अल्पप्रतिसाद मिळाला. दरवर्षी घटस्थापनेच्या आठ दिवस आधी मूर्तींची बुकिंग होत असते. यंदा बुकिंगलाही कोणीच आले नाही. तीनशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत त्यांची विक्री झाली. आज 10 टक्केही मूर्तीची विक्री झाली नसल्याचे अनेक मूर्तिकारांनी सांगितले.
जिल्ह्यात बुर्‍हाणनगर येथील आई तुळजाभावणीचे मंदिर आणि मंदिराची देखभाल करणारे भगत कुटुंब हे तुळजामातेचे माहेर समजले जाते. दसर्‍याच्या सीमोल्लंघनाला पालखी आणि कोजागिरी पौर्णिमे पर्यंत निद्रेसाठीचा पलंग पाठवण्याचा मान भगत कुटुंबाला आहे. यानिमित्ताने बुर्‍हाणनगरचे तुळजामातेचे मंदिर हे भाविकांसाठी महत्वाचे आहे. दुपारी बारा वाजता याठिकाणी घटस्थापना करण्यात आली तसेच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर, राशीन येथील रेणुका माता मंदिर, केडगाव, सोनई, घोडेगाव तसेच निघोज येथील आई मळगंगा मंदिर ही ठिकाणे जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यातील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. नवरात्रात भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. तसेच यानिमित्तानं यात्रौत्सव भरवले जातात.
मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक उत्सव रद्द करण्याचा निर्णय संबंधित देवस्थानांनी घेतला आहे. दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. असे असले तरी परंपरागत पूजा करत घटस्थापना, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर असलेल्या आई रेणुका मातेचा नवरात्र उत्सव प्रसिद्ध आहे. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश हे या संस्थानचे अध्यक्ष असून त्यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.
आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस नऊ रूपांतील विविध सालंकृत पूजा बांधल्या जाणार असून, त्याची माहिती पुढीलप्रमाणे
शनिवारी (ता. 17) : कुण्डलिनीस्वरूपा रूपातील पूजा ः जिचा रंग उगवत्या सूर्याप्रमाणे आहे, जिचे तीन नेत्र आहेत, जिच्या मुकुटावर माणिक आहेत आणि जिचे मस्तक चंद्रकोरीने सुशोभित आहे, जिने लाल कमळ धारण केले आहे, जी सौम्य आहे, रत्नांनी भरलेल्या घड्यावर जिचे पाय विराजमान आहेत, अशा पराम्बिकेचे ध्यान करावे, असे या पूजेचे माहात्म्य आहे.रविवारी (ता. 18) : पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक ः श्री अंबाबाई जेव्हा महाविष्णूस्वरूपात पराशरांना दर्शन देते तेव्हा  त्यांचा सर्व संशय फिटतो व ते अंबाबाईला विष्णुस्वरूपिनी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात व संशय हरण करणार्‍या अष्टकाने स्तुती करतात.
सोमवारी (ता. 19) : नागकृत महालक्ष्मी स्तवन ः पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठीच्या तपोसाधनेची झळ नागलोकांना होऊ लागते. त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात; परंतु शेवटी शापभयाने
नागलोक पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यास योग्य जागेविषयी विचारतात, तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीर क्षेत्री जाऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन तिलाच विचारण्यास सांगतात. तेव्हा नागलोक अंबाबाईचे दर्शन घेऊन तिची स्तुती करतात.
मंगळवारी (ता. 20) : सनतकुमारांनी सांगितलेले महालक्ष्मी सहस्रनाम ः मार्कंडेय ऋषी आणि नारद मुनी यांच्या संवादातून सनतकुमारांनी सांगितलेले श्री अंबाबाईचे सहस्रनाम उद्धृत केले आहे. सनतकुमार योगिजनांना श्री अंबाबाईची हजार नावे सांगतात आणि तिची स्तुती करतात.
बुधवारी (ता. 21) :ललिता पंचमी ः गजारूढ अंबारीतील पूजा.
गुरुवारी (ता. 22) : श्री शिवकृत महालक्ष्मीस्तुती ः करवीर क्षेत्रात असलेले दशाश्वमेध तीर्थ व त्याचे महत्त्व श्री शिव मुडानीला सांगतात व उमेसह करवीर क्षेत्री राहण्यासाठी क्षेत्र देवतेची म्हणजेच श्री अंबाबाईची स्तुती करून परवानगी मागतात. तेव्हा अंबाबाई श्री शिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व तेथील प्रत्येक जीवासअंती तारकमंत्राचा उपदेश करण्यास सांगते. तोच ईशान सध्या अंबाबाई मंदिराच्या उजव्या बाजूचा काशीविश्वेश्वर. त्याच्यासमोर काशीकुंडही आहे.
शुक्रवारी (ता. 23) :अगस्त्यकृत सरस्वती स्तवन ः अगस्ती मुनी जेव्हा पत्नीसह करवीरस्थ त्रिशक्तीचे म्हणजेच श्री महाकाली, श्री अंबाबाई आणि श्री महासरस्वती यांचे दर्शन घेतात तेव्हा त्यांच्या तोंडून त्रयीमूर्तींची स्तुती-स्तोत्रे बाहेर पडतात. त्या स्तवनापैकीच हे एक महासरस्वतीचे स्तवन
शनिवारी (ता. 24) : अष्टमी ः महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा
रविवारी (ता. 25) : दसरा ः अश्वारूढ पूजा


No comments:

Post a Comment