देशपांडे रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी मांडल्या नगरसेवक बोराटेंकडे व्यथा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, October 17, 2020

देशपांडे रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी मांडल्या नगरसेवक बोराटेंकडे व्यथा

 देशपांडे रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी मांडल्या नगरसेवक बोराटेंकडे व्यथा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरासह जिल्ह्यातील असंख्य महिलांना प्रसुतीसाठी उपयुक्त व वरदान ठरलेले बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आता मात्र कर्मचारी संख्या अभावी मोठ्या संकटात सापडले आहे. याबाबत येथील सर्व कर्मचार्यांनी प्रभागाचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युनिअनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्यापुढे व्यथा मांडल्या. त्यांनी लगेच मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याशी संपर्क साधून येथे पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची मागणी केली. तसेच बंद असलेल्या रक्तपेढीमधील पूर्ण स्टाफ या ठिकाणी देण्याविषयी चर्चा झाली.
अनेक दिवसांपासून येथे कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे, त्यामुळे येथील कर्मचार्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. जर यामध्ये सुधारणा न झाल्यास येथील कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश राजुरकर, परेश लोखंडे आदि उपस्थित होते
यावेळी नगरसेवक बोराटे म्हणाले की, मनपामध्ये कर्मचारी भरती व्हावी, याबाबत आपण स्वत: नगरविकास मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. जी अवस्था मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची आहे, तीच अवस्था मनपाच्या इतर विविध विभागांची आहे. त्यामुळे कर्मचार्यांवरील ताण वाढला आहे. मनपाने तातडीने भरती करुन कर्मचार्यांची संख्या वाढवावी.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालयात प्रसुती विभाग बंद आहे, त्यामुळे मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयावरील ताण वाढला आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनपा आयुक्त पदाचा चार्ज आला असता त्यांनी या ठिकाणी पाहणी करुन विविध उपाय योजना करण्याचे सांगितले. मात्र याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही.  त्यानंतर मनपाला पूर्णवेळ आयुक्त आल्याने त्यांनाही याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले परंतु याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment