नवरात्रौत्सवानिमित्त जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा ः कुटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

नवरात्रौत्सवानिमित्त जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा ः कुटे

 नवरात्रौत्सवानिमित्त जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा ः कुटे

उत्सव नऊ दिवस नवमहानायिकांचा एकपात्री प्रयोगाव्दारे जागर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र प्रदेश ‘जिजाऊ ब्रिगेड’ तर्फे नवरात्रौत्सवानिमित् नऊ दिवस ‘जागर लोककलेचा, वसा स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज बहुजन महानायिकांचे एकपात्री प्रयोग, तसेच महाराष्ट्रभरातील विविध सांस्कृतिक लोकगीते जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सादर करणार आहेत. त्यासह अनिष्ठ रुढी -परंपरा, अंधश्रध्दा निर्मुलनपर आणि स्त्रीशक्तीचे दर्शन या विषयांवर व्याख्यानमालेसह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या शिवमती जयश्री अशोक कुटे यांनी दिली आहे.
शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी दुपारी 2 वाजता ऑनलाईन होणार्‍या कार्यक्रमाचे उदघाटन शिवधर्म संसद सदस्या तथा माजी आ. रेखाताई खेडेकर यांच्याहस्ते होणार आहे. नंतर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाधक्ष्या माधुरी भदाणे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करतील. विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांसह अतिशय दुर्मिळ अशा विषयांवरील व्याख्यानेही होणार आहेत. त्यामध्ये शिवप्रदीपाचार्य डॉ. दिलीप धानके (ठाणे) यांचे जिजाऊ पारायण, पहिल्या अहिराणी डॉक्टरेट व साहित्यिक डॉ. प्रा. उषा सावंत (नाशिक) यांच्या जात्यावरच्या ओव्या, लग्न व हळदीगीत आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक  व मुक्त पत्रकार डॉ. सुभाष देसाई (कोल्हापूर) यांच्या अंबाबाई माहात्म्य, सत्य व मिथके यावरील व्याख्यानाचा समावेश आहे. ड. शंकरराव निकम (मुंबई) यांचे ‘स्त्री पुरुष समानता व स्त्रियांचे धार्मिक अधिकार’ या विषयांवर व्याख्यान होणार आहे. कवयित्री व लेखिका प्राचार्या डॉ. अनुराधा वरहाडे यांच्याशी लाईव्ह हितगुजदेखील होणार आहे. प्रख्यात निवेदिका व जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख क्षीप्रा मानकर (अमरावती) यांचे समाज घडणीसाठी समाज परिवर्तन यावर व्याख्यान होईल. डॉ. विजय चोरमारे (कोल्हापूर) यांचे ‘वर्तमानातील स्त्री शक्ती ओळख’ या विषयावर व्याख्यान होईल. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. साहेब खंदारे (परभणी) हे देवींबाबत मिथकांचा संबंध’ यावर समारोपीय व्याख्यान करतील.
या संपूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक व्यवस्था क्षीप्रा मानकर सांभाळणार आहेत. हे सगळे कार्यक्रम 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2020 रोजी या काळात दररोज दुपारी 2 ते 4 वाजता महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या अधिकत पेजवर पाहायला मिळतील. जिल्हयातील सर्व फेसबुक युझर्सनी या पेजवर कार्यक्रम पहावा. तसेच नगर जिल्हयामार्फत संगमनेर तालुक्याचा कार्यक्रम दि. 19 रोजी जरूर बघावा असे आवाहन महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सहसचिव राजश्रीताई शितोळे, राज्य कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई कुटे व डॉ. दिपालीताई पानसरे, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षा संपूर्णा सावंत, जिल्हा उपाध्यक्षा डॉ. श्रद्धा वाणी, जिल्हा कार्याध्यक्षा वृषाली कडलग, संगमनेर तालुकाध्यक्षा निलम शिंदे, माधुरी शेवाळे, सुवर्णा खताळ , श्रद्धा देशमूख , उज्वला देशमूख , वृषाली साबळे, स्नेहलता कडलग यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment