राज्यसरकार जबाबदारी कधी उचलणार- अ‍ॅड. आगरकर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

राज्यसरकार जबाबदारी कधी उचलणार- अ‍ॅड. आगरकर.

 राज्यसरकार जबाबदारी कधी उचलणार- अ‍ॅड. आगरकर.

शेतकर्‍यांच्या नशिबी कायम हालअपेष्टा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  शेतकर्‍यांच्या नशिबी कायम हाल अपेष्टा ठरलेल्या आहेत. अतिवृष्टीने अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, आता त्यांना आधार देण्याऐवजी राज्यातील नेते आणि मंत्री केंद्राकडे बोट दाखवू लागले आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षीही अतिवृष्टी झाली त्यावेळी मदत केली आणि यावेळीही करेल, मात्र राज्य सरकार आपली किती जबाबदारी उचलणार हे एकदा जाहीर करून शेतकर्‍यांची चालविलेली कुचेष्टा बंद करावी, असे भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर यांनी म्हटले आहे.
परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडविला. राज्यासह जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके गेली. अनेकांच्या शेतात तळी साचली असून, शेतकर्‍यांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. काहींची घरे पडली. जनावरे मृत्युुमुखी पडली, ताली वाहून गेल्या. यावरून बांधाबांधावर चाललेले राज्यातील सत्ताधारी शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखेवर मीठ चोळत असल्याचे सांगत अ‍ॅड. आगरकर यांनी म्हटले आहे की, मागीलवर्षी याच काळात अतिवृष्टी झाली त्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य एकदा तपासण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांनी त्यांची त्यावेळची वक्तव्य आणि आजची वक्तव्य यातील फरक पाहिल्यास शेतकर्‍यांचा खरा दु:खहर्ता, तारणहार कोण, याचा अंदाज येईल.
तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली होती. तसेच केंद्र सरकारकडूनही मदत आणली होती. यावेळी मुख्यमंत्री घराबाहेर पडले, हेच शेतकर्‍यांचे नशीब. गावोगावी पाहणी करण्याबरोबरच शेतकर्यांच्या पदरात काय टाकणार, हे मात्र सांगायला ते विसरत आहेत. सत्तेतील प्रत्येक नेता केंद्राकडे बोट दाखवून रिकामा होत आहे. केंद्र सरकारची जशी जबाबदारी आहे, तशीच किंवा त्यापेक्षा अधिक जबाबदारी राज्य सरकारची आहे, याचा विसर या सत्ताधार्यांना पडला आहे. पंचनाम्यांसह इतर बाबींना वेळ लागणार नाही, याची काळजी घेतानाच शेतकर्यांना तातडीने या संकटातून सावरण्यासाठी काही मदत घोषित करण्याची नितांत गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्राकडे बोट दाखवत शेतकर्‍यांच्या जखेवर मीठ चोळले जात आहे. शेतकरी राजा आहे म्हणून आपली सत्ता आहे, हे कोणत्याच पक्षाने विसरायला नको. भाजपची सत्ता असताना शेतकर्यांना प्रत्येक संकटात मदत दिलेली आहे. या सरकारच्या काळात किती मदत शेतकर्यांच्या पदरात पडली, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकर्‍यांचे नेते म्हणविणार्‍यांनी त्यांना आणखी दु:खात लोटण्यापेक्षा आपली जबाबदारी ओळखून दिलासा देण्याची गरज आहे. यात तरी किमान राजकारण होऊ नये, असे आवाहनही अ‍ॅड. अभय आगरकर यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here