खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 20, 2020

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित?

 खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित?

भाजपाला मोठा धक्का; 22 तारखेला भाजपाला रामराम


मुंबई-
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे.
फक्त एकनाथ खडसेच नाहीतर त्यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसात भाजपला दोन मोठे धक्के बसणार हे नक्की..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे प्रवेश करणार आहे. दरम्यान मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होईल असे देखील सांगितले जात आहे. जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष तसेच एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. यासह एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना 22 ऑक्टोबरला 10 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंबाबत केलेल्या सूचक विधानानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आला आहे. मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यासाठी खडसेंच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात एकनाथ खडसे पक्षात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.रविवारी दिवसभर एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची बातमी माध्यमात झळकली होती, मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र त्याचा इन्कार केला. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते भाजपातच राहतील याचा मला विश्वास आहे. पक्षाकडून कोणत्याही सदस्याने राजीनामा दिला नाही, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे मला कोणत्याही नेत्याचा राजीनामा मिळाला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौर्‍यावर असताना यांना पत्रकारांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, अजित पवारांनी चक्क हात जोडले. तसेच, मला याबद्दल काहीही माहिती नाही. ज्या गोष्टीची मला माहितीच नाही, त्याबद्दल मी तुम्हाला कसं काय सांगणार? असा प्रतिप्रश्नही अजित पवार यांनी केला. त्यामुळे, पत्रकारांमध्ये हशा पिकला.एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तर आज झालेल्या पत्रकार परिषदेतही फडणवीसांना हा प्रश्न विचारला असता, असे मुहूर्त रोज सांगितले जातात, मी त्यावर बोलणार नाही असं सांगत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य करणं टाळलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here