अखेर खडसेंच्या गळ्यात पडला राष्ट्रवादीचा गमछा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, October 23, 2020

अखेर खडसेंच्या गळ्यात पडला राष्ट्रवादीचा गमछा!

 अखेर खडसेंच्या गळ्यात पडला राष्ट्रवादीचा गमछा!


मुंबई ः
महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्याही आधीपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची पक्षावर आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची नाराजी उघडपणे व्यक्त होत होती. मात्र, नाथाभाऊंनी वारंवार तक्रारी करून देखील त्यांच्या तक्रारींचं निवारण काही केल्या झालं नाही. अखेर या सगळ्याला कंटाळून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय झाल्यानंतर भाजपच्या राज्यातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नाथाभाऊंचा निर्णय चुकला असा सूर आळवत सगळा दोष एकनाथ खडसेंच्याच माथ्यावर मारला आहे. मात्र, एकनाथ खडसेंच्या रुपाने फक्त उत्तर महाराष्ट्रातलाच नाही तर महाराष्ट्रातला एक लोकमान्य चेहरा भाजपने गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खडसेंनी राष्ट्रवादी काँघ्रेसमध्ये झालेला प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. अजित पवार मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत.
    यावेळी जयंत पाटील म्हणाले, मी आधी देखील खडसेंना पक्षात येण्याबद्दल विचारलं होतं. पण माझा पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही, असा त्यांना विश्वास होता. गोपीनाथ मुंडेंसोबत खडसेंनी भाजप वाढवण्याचं काम केलं. पण कानामागून आला आणि तिखट झाला असे प्रकार भाजपमध्ये झाले. खडसेंवर नेहमीच भाजपमध्ये अन्याय झाला. माध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. पण आम्ही सर्वांनी काही देतो असं सांगून खडसेंशी कधीच चर्चा केलेली नाही. एका वेगळ्या विचाराने ते भाजप सोडून आले आहेत.
सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम घ्यायचा आदेश पवार साहेबांनी दिला होता. मी म्हटलं होतं 50च खुर्च्या घालू. पण इतक्या संख्येनं लोकं आत आले त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे. राज्याच्या विधानसभेत 1990 साली खडसे भाजपकडून पहिल्यांदा विधानसभेत आले. तेव्हापासून मीही सभागृहात आहे. मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष असताना अनेकदा खडसेंनी दाखवून दिलंय की विधिमंडळाचा सदस्य काय करू शकतो. खडसेंची विरोधी पक्षनेता म्हणून कारकिर्द देखील आम्ही पाहिली. खडसेंसारखा दिग्गज नेता 2014 साली आलेल्या भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होता. पणपहिल्या रांगेत बसलेल्या नेत्याला मागच्या रांगेत बसवण्याचं काम भाजप सरकारमध्ये झालं. सभागृहात खडसेंवर चालू असलेल्या अन्यायावर मीच सगळ्याच जास्त बोललो असेन. आज त्यांना कळेल की अभीभी पिक्चर  बाकी है. महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कधीही पाहिलं नाही. 2019च्या निवडणुकीआधी आम्ही सगळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. लोकसभेत आमच्या पक्षाला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत भलेभले लोकं आम्हाला सोडून गेले. पण आम्ही सगळे शरद पवारांवर ठाम विश्वास ठेऊन होतो. पवारांना ईडीची नोटीस देण्यापर्यंत मजल गेली. 79 वर्षांचे शरद पवार महाराष्ट्रभर फिरले. त्यातून आजच्या सरकारचा पाया रचला गेला. आमचं तीन पक्षांचं सरकार आहे. महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली, पूर आला तिथे शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. दरम्यान, 2 वाजता होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 3.30 वाजता सुरू झाल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कारण राष्ट्रवादीचे सर्व नेते पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कार्यालयात असताना शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड वाय बी सेंटरवर दोघंच चर्चा करत होते. जितेंद्र आव्हाडांचं खातं एकनाथ खडसेंना दिलं जाण्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवरच ही बैठक झाल्याचं बोललं जात होतं.

No comments:

Post a Comment